……….खेळ मांडला….मांडला……मांडला…!!!!!!!!

एक महिनाभर अजिंक्य पुण्याला बहिणीकडे गेला होता. आज परत येतोय. काल रात्री त्याचा फोन आला. आई इथे बातमी आलीय की, सातवी च्या मुलाने सूसाईड केले. तो स्टडी मध्ये वीक होता. आजीने काय सांगितले लक्षात आहे ना? अजिंक्य, ला रागवत जाऊ नकोस म्हणून. मम्मी, तुला छान वागता येते ना? अरे, अभ्यास वेळेवर केला की, टेन्शन रहात नाही. तू कशाला एवढी काळजी करतोस. असे माझे विचारणे सुरु झाले.

अग, इंडियात एक मराठी मुव्ही आलाय त्यात दाखवले आहे की, पेरेंट्स नीट वागत नाहीत. क्रिकेट मध्ये त्याला करिअर करून देत नाहीत. एजुकेशन सिस्टीम चेंज करायला पाहिजे. कशाला मी ह्याला भारतात पाठवले असे मला झाले. तो इकडे मराठी बातम्या फारशा पाहत नाही. ह्या आत्महत्येच्या बातम्या म्हणून दूरच राहतात. पण पळणार तरी कुठे? व किती काळ? कधीतरी ह्या सर्वाना त्याला सामोरे जावेच लागेल. आठवीच्या अर्धवट वयाचा हा माझी रात्रभर झोप उडवून गेला. आणि म्हणतो कसा सहावी पर्यंत पेरेंट्स शांत असतात पण नंतर ते टेन्शन मुलांना देतात. मम्मी तू आता चेंज होणार नाहीस ना? आजी समोर माझ्या स्वभावाची कबुली चाललेली होती.

ह्या वयाच्या मुलांना गळफासाची गाठ कशी जमते? साधी बुटाची लेस धड बांधता येत नाही. हा स्काउट व गाईड मध्ये शिकलेल्या गाठींचा दुष:परिणाम तर नसावा???? तसेच फास टांगण्यासाठी हात एवढ्या उंचीवर पोहचतात कसे? नाडीची घट्ट गाठ ह्यांना सोडवता येत नाही मग हे ट्रेनिंग मिळते कुठून???? सिनेमात देह लटकलेले दाखवतात. गाठी कशा बांधतात हे अजून तरी पाहण्यात आले नाही. माझ आतापर्यंत एवढूस असलेलं बाळ कसले प्रश्न विचारू लागलं आहे.

मला पेरेंट्स कौन्सलिंग नवीन नाही. पण माझ्या शिक्षणाच्या मागे व अनुभवाच्या पुढे माझ्यातली आई, आज हादरली आहे. सामंजस्याने, लेकाशी गप्पा करून सुसंवाद मी करणार आहेच. पण किती स्फोटक व टोकाचे विचार ह्या पिढीत आहेत. मुलांच्या स्वातंत्र्याच्या सीमारेषा, आई वडीलांचे स्पर्धात्मक जीवन जगण्यासाठी चाललेली धडपड हे एक कारण आहे.

तमाशा डान्स फॉर्म वर पण एक मुव्ही आहे. तो हिरो पण खूप स्ट्रगल करतो. आई, मग इथल्या नेहा सावंत ला डान्स मध्ये करिअर करायचे होते तर पेरेंट्स ने रिफ्युज का केले? तिने पण सूसाईड केले. तुम्हा मोठ्या माणसाना असे मुव्ही आवडतात ना, मग चिल्ड्रन ना परमिशन का देत नाहीत? अरे तिची परीक्षा जवळ आलेली असेल, किंवा अजून दुसरे कारण असेल म्हणून तिला रिफ्युज केले असेल.

आपल्याला पूर्ण माहिती आहे का? माझे समजावून सांगणे चालू होते. बाळा, अभ्यास महत्वाचा असतो रे!! रिफ्युज केले नाही तर फक्त स्टडी कडे लक्ष दे असे पेरेंट्स ने सांगितले. आधी अभ्यास महत्वाचा, साईड बाय साईड हॉबी पूर्ण करता येते. बेसिक एजुकेशन कॅम्पलीट पाहिजे. काय करणार पालक?? आपल्या पाल्यांना ह्या चकमकत्या दूनिया पासून कसे दूर ठेवणार?

तू कशाला विचार करतोस? मम्मा, आमच्या जनरेशन चा क़्वेशचन आहे. बर तू उद्या येतोस ना मग आपण बोलू या. मी विषय टाळण्याचा प्रयत्न करीत होते. एक महिना अजिंक्य शिवाय राहणे मला कर्म कठीण होते. उद्या येणार म्हणून कसली खुश होते तर हे महाशय प्रश्न विचारून झोपून गेले. मी मात्र हैराण झाले. ही बातमी कालच्या पेपर मध्ये होती. माझ्या हाती कालचा पेपर आज मिळाला. बातमी पूर्ण वाचल्याशिवाय मला ही सुचत नव्हते.

पुन्हा दहा मिनिटांनी अजिंक्यचा फोन आला, मम्मी अजून एक सॅड न्यूज आहे. मेडिकल च्या एका गर्ल ने पण सुसाईड केले. ती हुशार होती पण टू सब्जेक्ट मध्ये फेल झाली. मम्मा, मग मी कशात करिअर करू? ह्या वयात करिअर चा विचार स्पष्ट झालेला नसतो. मुलांच्या मनात खूप गोंधळ असतो. असे काही कळले की त्यांना त्या विषयात इनसीक्यूअर्ड वाटायला लागते. त्याच्या मनातला गोंधळ तो आताच माझ्याशी शेअर करीत होता. माझ्याशी बोल्याशिवाय चैन पडले नसते. तू इकडे आल्यावर आपण बोलू असे समजावत वेळ तात्पुरती निभावून नेत होते. पण हा विषय त्याच्या डोक्यातून जाणार नाही जो पर्यंत समाधान त्याला माझ्या कडून मिळणार नाही याची पूर्ण जाणीव मला आहे.

मम्मा आत्ता एक चांगली न्यूज देतो. पुण्यात थंडी खूप होती म्हणून मी पण चहा प्यायला लागलो. आता तिकडे आल्यावर तू मला रोज चहा करून दे. मुलांनी दुध प्यावे बुद्धीवर्धक असते. हा माझ्या वर ठाम पणे झालेला संस्कार आहे. दहावी नंतर ठीक पण आताच योग्य नाही. बरेच जण चहा लहानपणापासून घेतात. मोठे झाल्यावर चहा ढोसणे असतेच.

हे वय ग्लास भरून दुध घेण्याचे आहे. बाहेरचे कोणी कधी ही घेऊ देत. मला पटत नाही व पटवून घेण्याची गरज पण नाही. आई,त्याला समजावून सांगत होती. मला फोन वर तिचा आवाज ऐकू येत होता. थंडी होती म्हणून दिला. तिकडे एसी असतो ना मग नाही घ्यायचा. आजी चहा छान करते तिच्या कडून रेसिपी शिकून घे. हा सल्ला ही द्यायला विसरला नाही. मी चहा घेते पण कुठल्याच गोष्टी करिता टोकाची आवड, त्या करिता ऍडीक्ट होणे माझ्या स्वभावात नाही. माझा बोलण्याच्या आवाजाचा अंदाज घेऊन मग म्हणाला, कधी तरी देशील का? बर ठीक आहे. मी पुन्हा विषय क्लोज करण्याचा प्रयत्न करू लागले.

माझ्या घरात चहा सकाळी एकदाच होतो. ह्यांना ऑफिस मध्ये बऱ्याच वेळेला घ्यावा लागतो. हे पण बिन दुधाचा, बिन साखरेचा ‘सुलेमानी’ चहा घेतात. घरी आल्यावर कधी ही चहा घेत नाहीत. मला चहा आयुष्यभर घेतला नाही तरी चालेल. माझा सकाळचा चहा मी उद्या पासून बंद केला. अगदी कायमचा हे ठरवून टाकले आहे. त्याला मोह कसा टाळावा हे शिकवण्याचे आताचे वय योग्य आहे. एकेक गोष्टींचा विचार करत रात्र उलटून पहाट झाली हे कळेलच नाही.

लहान होता तेंव्हा माझ्या हाताला घट्ट पकडून चालायचा. आता माझ्या बाळाचा हात माझ्या हातापेक्षा मोठा झालाय. कसे समजावून सांगू? प्रत्येक गोष्टीचे स्पष्टीकरण हवे असते. मी ही समजावून सांगत असते पण आई जगापेक्षा लहान आहे. त्यालाच अनुभव घ्यावा लागणार आहे. मी कुठ पर्यंत पोहोचणार?

जीवन म्हणजे खेळ नाही. जिंकणे व हरणे हे आयुष्य करिता नसते. जीवनाला सामोरे जायचे असते. खेळ म्हणून आयुष्य मानले नाही तर हार कुठली? व जीत कसली राहणार?. सर्व आयुष्य हे एक रोज वेगळा अनुभव देणारे ठरेल. त्या आयुष्यात निराशा नसेल, यश मिळावे म्हणून जीवघेणी स्पर्धा नसेल. तसेच यशाची धुंदी ही नसेल.

जीवनाकडे स्पर्धा म्हणून आपल्या पाल्याला बघायला शिकवू नका. आयुष्य म्हणजे रिअलिटी शो नाहीत. स्वप्न पाहायला मुलांना जरूर शिकवा पण सत्य पण कानी घाला. हार किंवा जीत ह्या करिता जन्म नाही. अवास्तव अपेक्षांना वेळीच नियंत्रण करणे हे पालकांच्या कौशल्याचे काम आहे. मुलांच्या मनात चाललेले विचार त्यांच्याशी बोलून समजून घेणे गरजेचे आहे. आयुष्य हे खेळ आहे. असे समजल्यामुळे आशा, निराशा पदरी येते. जीवनाकडे एक अनुभव म्हणून पहिले तर बरेच पालक चिंता मुक्त होतील.

माझ्या लिखाणाद्वारे मी प्रयत्न केला, मुलांच्या मनातील खेळ मी मांडला…. मांडला…