खांद्यावरचे घर……………

अहाहा! अजबच! केव्हढे हे सामान. उगाच काढले बाई हे काम. बर झाल दुपारी पाहीले, हे ऑफिस ला आहेत म्हणून बर. वादाचा विषय झाला असता. तसा तो आहेच म्हणा, पण आज संध्याकाळी पार्टी ला जायचे आहे हा प्रकार आवरण्याचा पुन्हा पहिलाच पाहिजे. अडत तर माझ्या वाचून, स्वताचा खिसा तो केव्हाढसा काहीही मावत नाही, रुबाब तो करायचा. आता काहीतरी छोटेसे गिफ्ट घ्यावे तर लागणारच. ह्नं देतील मलाच सांभाळायला. डूकरीणी च्या पोटा सारखे वजन खांद्यावर कशी काय सांभाळतेस देव जाणे! ही आणि तक्रार वजा काळजी. माझा संसार मीच वाहते, पूर्वी कशी पाण्याची कावड असायची, तसेच परिवाराला लागण्याऱ्या सर्व गोष्टी हक्काने माझ्या खांद्या वरच्या घरात असतात.

खांद्यावरचे हे घर अजब परंतु बहुविध कारणांसाठी एकच पर्याय म्हणून कुटुंबाचा एक अविभाज्य घटक बनलेले असते. त्यावर सगळे अवलंबून असतात. घरातील खोडसाळ मंडळी कुत्सित पणे टोमणे ही देतात. मुले तर निवांत पणे खेळण्यासाठी किंवा त्यांचा वेळ जाण्यासाठी त्यांच्या माता, बाळ हातात हे घर खुशाल सोपवतात. हे युनिवर्सल आहे. हे घर गरजे प्रमाणे बदलते, घराचा आकार, त्यातील गोष्टी ह्या त्या व्यक्तींच्या विश्वा भोवतीच फिरत असतात. एकाच खांद्या वर चे हे घर प्रत्येक प्रसंगानुसार सरड्या सारखे आपला चेहरा मोहरा बदलत राहते.

परंतु युग कितीही पुढे गेले तरी ह्या खांद्या वरच्या घराची जवाबदारी काही कमी होत नाही. घरातील स्त्री ह्या सर्व समावेषक घराला नेहमी भरपेट ठेवते तिचा पती सुद्धा ह्या घरातील सामान चटकन शोधू शकत नाही. स्वताचा खिसा सुद्धा त्याला छोटा वाटतो. तिच्या घरासाठी त्याच्या पण वस्तू तिला सांभाळण्यासाठी देतो. हो! हे ‘वॉकिंग – टोकिंग’ घर म्हणजे खांद्यावरची पर्स होय. अनेकविध पर्स गोळा करण्याचा स्त्रियांचा जन्मतःच स्वभाव. त्यावरून त्यांच्या आवडी निवडी, व्यक्तिमत्व काय धाटणीचे आहे. हे हि निरीक्षण करण्याचा माझा स्वभाव आहे. बटवा……….ते पर्स असा भारतीय पोशाख लाभला आहे, तसाच वारसा पण भरजरी पैठणी सारखा आहे.

आजीच्या बटव्यात आणि चन्चीत हमखास आवडीच्या गोष्टी मिळायच्या. सुपारीचा तुकडा, फणी, पोटदूखीवर गोळ्या, लिमलेट गोळ्या, वाती व कापूस, झांझा आणि बरेच काही, सगळे खूप पहावयास मिळावे असे खूप वाटायचे पण आजी वस्ताद ढिम्म कशाला हात लावून द्यायची नाही. ती खूष झाली की हातावर नाणी मिळायची, गेलोच धूम ठोकत आवडीचे घ्यायला. भाऊ गोट्या, पतंग, रीळ, मांजा, भोवरा असले काहीतरी घेत असे. मी मात्र नाणी साठवून ठेवायची मग शाळे बाहेरचा खाऊ चिंचा, विदेशी गुलाबी तूरट चवीची चिंच, आवळे, बोर अहाहा! काय तो बटवा आणि अल्लाउद्दीन एकच वाटायचे.

मग आला जमाना आईचा, शाळेत शिक्षिका छोटासा डबा, पाण्याची बाटली, आणि हो अत्यंत महत्वाची म्हणजे फोल्डिंग ची भाजीची पिशवी, लाल, निळे पेन, पेन्सील आणि चष्मा, छत्री की निघाल्या शाळेत, येताना मात्र पर्स भरलेली उत्तर पत्रिकेचे गठ्ठे, हातात भाजी ची पिशवी हमखास असायची. मी कॉलेज ला जाऊ लागले रेल्वे च्या फिरत्या दुकानातील सर्व वस्तू माझ्या कडे असायच्या. म्हणून म्हटले की काळानुसार, गरजेनुसार बदल स्वाभाविक आहेत तेच स्त्री च्या अस्तित्वाचे निदर्शक आहेत. बटवा……….ते आय. टी. करिअर असा बदल झाला. हे घर कॉमप्याक्ट झाले. घरच काय सर्व जग चीप मध्ये सामावले, व पर्स मध्ये जाऊन बसले.

अचानक लागणाऱ्या वस्तू हाताशी असाव्या म्हणून बरेचसे पर्स मध्ये ठेवले जाते. तिचा सरंजाम पण वेगळा असतो. कन्या असेल तर सौंदर्य प्रसाधने, मुलगा असेल तर वयानुसार गोष्टी बदलतात. आई नीट सांभाळते म्हणून तिला दे, असा वडिलांचा आदेश असतो. दोन तासा करता जरी बाहेर पडले तरी ह्यातील एक तरी वस्तू आईच्या पर्स मध्ये येते. समजा काही अडचण आली तर खाण्या पासून सर्व गोष्टी धकाधकीच्या जीवनात जवळ ठेवाव्या लागतात. त्यात भर म्हणजे आता मास्क ठेवायचे. खर तर मी यादी देणार होते पण काही फोटो देते. वस्तूंचा अंदाज येईल.

पर्स चा आकार सतत काळानुसार, चित्रपट नुसार बदलता राहतो. आशा पारेख नटी च्या काळात उडत्या गाण्याच्या चालींवर बोटांवर फिरवता येणारी पर्स दिसली. आता पुन्हा मोठ्या पर्स ची सुरवात झाली. करीना चा नाजूक खांदा आणी, भली मोठी पर्स! काळजी वाटते, खांद्याच्या हाडाची दुखापत होईल का? कापडी झोळी राजेश खन्नाची, खांद्यावर लटकावली की जगाची काळजी झोळीत घेतली असा अभ्यासू चेहरा आपोआपच होतो. खांद्यापासून मस्तक फारसे लांब नाही. काही मुले, मुली ही शबनम कंबरेच्या इतकी खाली ठेवतात की पायांच्या तालाबरोबर ती पण आपल्या डोळ्यांना अस्वस्थ करते. ह्यांनी आईला पदर खोचून आटोपशीर काम करताना पहिले नाही का? अशी शंका येते. व्यक्तीची वृत्ती मी अशी न्याहळते.

पर्स ला अडकविण्या साठी नव्हे तर रूप अधिक खुलवण्यासाठी विविध गोष्टी मिळतात. तिला पण मेक ओव्हर ची गरज आहे. कुल लुक्स, …….लुक्स असे शब्द तरुणाईचे, एकूण काय काळ बदलतो आपण ही बदलूया. बटव्या चा इतिहास आठवूया आणी पर्स वरून लेख लिहूया ही उर्मी तयार झाली म्हणून पर्स आवरायचे निमित्त तयार करून हा प्रपंच खांद्या वरचा आपणा साठी सांभाळत आणला.

लहान बाळांच्या गुलाबी कॉटन च्या पिशव्या, त्या बाळाचे बाबा मी बाप आहे असा अभिमान बाळगत,सांभाळत राजाच्या तोऱ्यात बायको मागून चालतो ते पाहून पर्स ची कल्पना सुचली. आणी हो ही पोस्ट सर्वांची आहे कारण घरी आई, पत्नी, मुली,बहिण इत्यांदीच्या पर्स बाबत काही आडाखे प्रत्येकाच्या मनात असतातच. पुरुष वाचकानो तुमच्या वोलेट बाबत म्हणजे खिशातल्या पाकिटा बद्धल?

‘शावरमा’..मस्कतीय वडापाव

मरहबा! सुस्वागतम् !

‘शावरमा’ म्हणजे मस्कतीय वडापाव, हो! मी खरच सांगतीय. स्वस्त मिळणारा, पूर्णान्न असणारा हा मांसाहारी पदार्थ. आईने दिलेली ‘पोळीची सुरळी’, ह्या शाळेतल्या डब्याच्या खाऊ ची आठवण करून देणारा. शाकाहारी न पण इथे पर्याय आहे हं. नाहीतर माझ्या सारखीची पंचाईत झाली असती. पोळी च्या ऐवजी खास आट्याचा गोलच, पण बिन तेलातुपाचा, दोन पदरी असा ‘खुबुस’ असतो. त्यालाच पिट्टा ब्रेड असे हि म्हणतात.

खुबुस चा स्तर वेगळा करून त्यामध्ये तूपा ऐवजी मायोनीज, ताहिनी (तिळाची) पेस्ट लावतात, कच्च्या उभ्या चिरलेल्या भाज्या म्हणजे कोबी. भोपळी मिरची, काकडी, सलाड, सेलरी, व बटाट्याच्या तळलेल्या सळ्या. हे सर्व ठेऊन त्यावर शावरमा मशीन मधून काढलेले चिकन किंव्ह्वा लाल मासं (मसाला लावलेले, तिखट नसते.) आगीवर खरपूस भाजलेले चपट्या चकत्यांचा रुपात त्यावर ठेवतात. गुंडाळी करून, कागदी रुमालात मध्ये देतात.

शाकाहारी जणां करिता त्यात ‘फलाफील’ असते. कबुली चणे भिजून, वाटून त्यात मसाला घालून च्या वड्या तळून, चिकन ऐवजी ठेवतात.

भारतात पण बऱ्याच ठिकाणी मिळतो. पण इथे गल्लोगल्ली वडापाव सारखा आहे. मस्कत मध्ये फिरण्या आधी पोटोबा तर पहिला, कारण तिथूनच भटकंतीचा मार्ग विठोबाचे नाव घेऊन सुरु होतो. असा मस्कतीय वडापाव …… शावरमा.
भारतीय रुपयात साधारणपणे ३६ तर इथे ३०० बैसे. कमी किमतीत मिळणारा परंतु पौष्टिक असा एकच शावरमा खाल्ला तरी पूर्ण जेवण होते. तसा हा प्रकार मिडल इस्ट देशात लोकप्रिय, गरीबांचे खाणे म्हणून ओळखला जातो. मस्कत मध्ये जसा रस्तोरस्ती, प्रत्येक राउंड अबाउट म्हणजे नाक्यावर मिळतो तसा बाकी ठिकाणी कमी आढळतो.

शावरमा ची टपरी आपले मल्याळी, लेबेनॉन देशाचे लेबनीज, टर्की देशाचे असे वेगवेगळे लोक चालवतात पण मूळ मालक ओमानी माणूस असतो. एका दिवशी शावरमा चा खप साधारण पणे ६०० पर्यंत असतो. ५० किलो चिकन लागते. हा खप एका दुकानातील असे अनेक ठिकाणी मिळतातआधी हा मस्कतीय शावरमा खाऊन, मग मस्त मस्कत बघायला जाऊ.

इडली……..सासूबाई……..आणि मी

आपल्याकडे बघण्याचा कार्यक्रम करून ठरवलेले लग्न साधारण पणे जवळचा मुहूर्त पाहून लगेच करण्याची मानसिकता असते. माझे ही लग्न, मे मध्ये पसंती झाली व जून चा मुहूर्त पालकांना मिळाला. सासर सांगलीचे, पण मुलाचे घर ठाण्यात माझ्या माहेरच्या गावात. कार्यालय पण ठाणे येथेच घेतले. मुलाच्या घरी माझी पसंती झाल्यानंतर त्यांच्या आई वडिलांनी ठाणे येथील मुक्काम वाढवला. त्यांना मदत करण्याची जवाबदारी मीच अत्यंत हुशारीने स्वतावर घेतली.

शिक्षिका म्हणून मी तयार होतेच, निरीक्षण करणे हा माझा छंदच, त्यातून होणाऱ्या सासूबाई हे एक आकर्षण. मला नाही वाटत, कि लहानपणापासून कुठलीही आई, ‘सासू’ ह्या विषयावर मुलीला काही पढवत असेल, ही कृपा मालिका करतात. आता मी हुशार कशी ते सांगते. प्रेमाचा मार्ग पोटातून जातो हे पाठ झालेय आता. मी ही सासू च्या मुलाकडून ” मेरे मां जैसा खाना, मै भूल नाही सकता” हे संवाद मला ऐकवू नयेत म्हणून भावी पतीच्या पोटाचा मार्ग शोधण्याकरता, मदतीच्या निमिताने मी तिकडच्या घरी जाऊ शकत होते.

अहो! आई’’ हे लग्ना आधी सासूला हक्काने म्हणता येते ( भावी पतीला अहो! चा सन्मान लग्ना नंतर मिळतो) तशाच हाका मारून माझी मस्का पोव्लीसी मी ही केली. त्यांची पाककला पहावी, म्हणजे मुलाला आईच्या खाण्याची आठवण न यावी. माझा दुष्ट हेतू अजिबात नव्हता सासूचा मुलगा सुखी व्हावा ही तळमळ होती हो माझी.

‘नवरा’ म्हणून नवीन जवाबदारी स्वीकारणारा माझा भावी पती त्याच्या गावीही नव्हते मी कुठल्या तळमळीने येते. माझ्या सासूबाई ठाण्यात नव्या, मला मे महिना म्हणून शाळेला सुट्टी होती. जून मध्ये सुट्टी घ्यायची म्हणून नवरा मुलगा मे मध्ये फक्त रविवारी घरी सापडायचा. साहजिकच माझी हजेरी तिकडे शुभप्रभात पासून असायची. प्रेम विवाहात जवाबदारी मुलीची फक्त सासरच्यांना आपलेसे करणे एव्हढे असते, पण आमच्या सारख्यांच्या जवाबदारीत पूर्णपणे सगळेच अनोळखी असते.

माझ्या आई चे वैतागणे व्हायचे घरी राहत नाही म्हणून पण मी अग् ठाण्यातच आहे न म्हणून तिला गप्प बसवत होते. गावातल्या गावात आई कडे जाणे हे काही तासां करताच होईल ह्याची जाणीव सासरी आल्यावर झाली. तरीही मी रविवारी नाश्त्याला तिकडे हजर. तिकडेच नाश्त्याला मला शोध लागला ‘ इडली’ करणे हे रहस्य आहे.

आता इडली काही नवीन प्रकार नाही माझ्या माहेरी इडली हा आवडता प्रकार होता. आई ही रविवारी हमखास इडली करायची. उबदार इडली हिरव्या चटणीत बुडवायची, दुसरा घास सांबारात लोलवायचा व जिभेवर ठेऊन आई कडे पाहून खुशाल हादडायचा अहा हा ! वाफाळलेली कॉफी ! मग वर्तमान पेपर घेऊन लोळत वाचणे! काय सुख आठवले.!! अजूनही माझा भाऊ हा आनंद घेतोय मी मात्र इथे नुसत्याच आठवणींवर राहते. विषयांतर नको…………

असो ही इडली सासरची, माझ्या सासूबाई नी केलेली, मी पती कडे पाहत होते, खूप रमले होते. हंंह फारच आवडती दिसते ह्यांना आई ची ही डिश. माझ्या मनात प्रेमाची बेरीज वजाबाकी सुरु झाली. हे आव्हान स्वीकारायलाच पाहीजे. दुसरा घास मी घेतला आणि आव्हान संपुष्टात आले. इडली पुढे शरणागती पत्करली, मी ही माहेर समजून सासू कडे अत्यंत आदराने पाहू लागले. विरघळत होती ती प्रत्येक घासाबरोबर, मी मुळात माहेरी कधी पदार्थात चमचा पण ढवळला नाही, आई चे फक्त निरीक्षण करायची. पण पदार्थांना मनापासून दाद द्यायची. इतके अगाध ज्ञान मजकडे होते. सुखी होते खाणे ते ही नुसते, करणे नाही. अज्ञानात सुख असते ते हेच वाटत.

पण आता ह्या पुढे माझे व ह्यांचे पोट माझी जवाबदारी होणार. म्हणून मी न धास्तावता हुशारीने शिकणे असे ठरवले होते. गुबगुबीत, स्वच्छ पांढरी, लुसलुशीत मऊ, पण जरा निवली कि स्वताचे अस्तित्व चिटकून न ठेवता सहजपणे आख्खी तळहातावर विराजमान होणारी, अलगद आपल्याकरता प्लेट मध्ये येणारी अशी माहेर सारखीच इडली पण सासर माहेर असा भेदभाव न करता आता मला माझ्या संसाराकरिता करायची.

चार रविवार संपले, व मी सासरी आले. सासूबाई ठाण्यातच होत्या. मी त्यांनी लवकर जाऊ नये म्हणून आग्रह केला होता. रविवार आला सकाळी जरा मी उठण्याची टंगळमंगळ च करते. नाश्त्याला इडली तयार. मी ओशाळले! अहो! आई म्हणत, आता पुढच्या वेळी मी करते. आणि मी केली. नेहमी सारखी झाली आवडली सगळ्यांना पण त्यांच्या सारखी नाही म्हणून मी खट्टू झाले.

आई, मला तुम्ही तांदूळ डाळ प्रमाणापासून दाखवा, सकाळी वाटताना माझ्या बरोबर उभ्या रहा, मी सावध पणा चा बाणा घेतला. माझी धडपड त्यांच्या लक्षात आली असावी कारण तीही सून होतीच न. त्यांनीही दाखवले तरी इडली माझ्या नेहमी सारखी. मग माझ्या मनात संशय येऊ लागला.अजून काहीतरी ह्या मिसळत असणार. मी शोधाशोध केली आणि काही पदार्थ पूरक आहेत असे कळले इडली ची तब्येत गुबगुबीत होण्यासाठी, पोहे, शिजवलेला भात, मेथी दाणे, इत्यादी अनेक गोष्टी कळल्या, गरज शोधांची जननी असते.

मी घरातील हे सर्व पदार्थ संपले आहेत ह्याची खात्री करून सूनवास करून आई उद्या इडली च करा न असा लडिवाळ हट्ट केला. माझ्या आई चे व त्यांचे फोन वर बोलणे व्हायचे दोघीही हसत असायच्या. मला माझ्या आई चा पण राग आयचा सासूबाई न सामील असायची. मग माझी जिद्द अजून वाढायची. पूरक पदार्थ कुठे आहेत हे सुद्धा त्यांनी विचारले नाही तरी सकाळी इडली संसार सुख मानव्ल्यासारखी टम्म फुगलेली.

मग मी हि ओशाळले. आईने हे संस्कार केले नाहीत. खरे सांगण्यासाठी धीर एकटवला.त्या हसून म्हणाल्या, ‘ अग् तू पण छान करतेस.माझ्या सारख्या पण जमतील’ काही दिवसांनी सासूबाई सांगलीला परत गेल्या. मी मात्र पूरक पदार्थांचा वापर करत प्रयोग सुरूच ठेवले. काय करणार पती परमेश्वर? ( देव म्हटले कि आपण चुका करायला मोकळे किती छान सोय आहे). नवरा पक्का खवय्या तसाच एक पोळी सोडली तर उत्तम सर्व पदार्थ करणारा, तेही कुठलाही पसारा न करता. त्यामुळे माझी पंचाईत होते.मी एकलव्य सारखी पाककला अभ्यास सुरु ठेवला. मध्ये मध्ये पाककला क्लासेस ( माझे पाककला वर्गे माहेरी भाऊ व इकडे हे ह्यांचा मला गप्प बसवण्याचे हुकमी साधन आहे) चा आधार घेत होते.

माझा लेक अजिंक्य तान्हे पणी भात चुरून खाऊ लागला तेंव्हा मी इडली ची ओळख करून देण्याचे ठरविले. ताटलीत इडली आणली. ‘चांदोमामा’ म्हणत त्याने आश्चर्याने आ केला. तो राम मी कौसल्या झाले. घास भरविला.त्याचा टेडी जवळ ओढला ”मम मम मऊ मऊ” म्हणत खाऊ गट्टम केला. आणि मी जिंकले. आईंचे बोलणे खरे झाले. माझ्या इडली चे रहस्य बाळाच्या डोळ्यात चमकताना दिसले. लेक वडिलांचे गुण तंतोतंत घेऊन जन्माला ला त्यामुळे हा हि खवय्या पसंत पडले तर लगेच प्रतिक्रिया देतो. जसे पोस्ट च्या लिखाणावरून आपण दाद देतो.

आईला व आईना फोन करून लगेच नातवंडाचे कोतूक कळवले. सासू होण्याआधी ती आई होती, हे उलगडायला मला मी आई झाले तेंव्हा कळले. आई तू हॉटेल का काढत नाहीस? इथपर्यंत सुखावत माझे अन्नपूर्णत्व कौशल्य झाले. आता तरी एकदाचे ज्याच्या साठी केला अट्टाहास …………..म्हणून सुस्कारा देणार तोच नवीन आव्हान दिवाळीत येते, ते म्हणजे माझ्या आईचे बेसनाचे लाडू. आज्जीच्या लाडू ची आठवण झाली असे म्हणून लेक पुन्हा मला बाणावरचे पितामह आठवून देतो.

‘तहान लाडू व भूक लाडू’ करून ठेवणाऱ्या आज्ज्या त्यांची सर आम्हास कशी येणार? लेक जस जसा मोठा होत गेला तश्या आवडी पण बदलल्या. मी पालक पनीर करताना दोन्ही आज्ज्या माझ्या बाजूला उभ्या राहून बघतात.माझ्या आई सारखे करा असा नातवंडाचा आग्रह असतो. ह्या झाशीच्या राण्या पदर खोचून तयारच असतात. पण मुद्द्याचे काय की, आता माझ्या पण पदार्थांना महत्व आले. आज्जी पुन्हा नव्याने आई होण्यास सुरवात झाली. तेही त्यांच्या साई च्या मायेकारिता.

आता माझ्या ह्या पोस्ट चा पुढचा भाग मी लिहीन जेंव्हा

पालकपनीर………….सुनबाई………आणी……मी असे होईल तेंव्हा. सध्या तरी ऐव्हढेच.

गृहलक्ष्मी चे यक्ष………

गृहकर्तव्यदक्ष हा एक मान, सन्मान स्त्रियांना आपसूकच मिळतो. ती अभियंता, डॉक्टर. वैमानिक इत्यादी बाबत कार्यरत असली तरी हा सन्मान पाठपुरावा करतच असतो. मानसिक दृष्ट्या मात्र ती आधुनिक होत नाही कारण परंपरेचा पगडा.

घर त्याची निगा, मुलांचे संगोपन ह्यात नवऱ्याचा पण सहभाग असतो. पण सर्व साधारण पणे ह्या फ्रंट वर स्त्रिया जास्त कार्यरत असतात. सर्व आघाड्या सराईत पणे सांभाळण्या करता नियोजन खूप महत्वाचे ठरते. त्या करिता आधुनिक उपकरणे हि कोणावरही अवलंबून न राहता मदत खूप करतात. हो! माझा रोख मानसिकते वर आहे. घरचे पोटमाळे अनेक उपकरणांनी भरलेले असतात. कधीतरी वापरू म्हणून अनेक गोष्टी घेऊन ठेवलेल्या असतात. कणिक आम्ही हातानेच मळतो. कारण खूप आहेत. एक तर समाधान, पोळ्या छान होतात आणि मुख्य म्हणजे फूड प्रोसेसरचे भांडे कोण घासत बसेल. मोलकरीण ला असले आम्ही देत नाही. आधीच घरची कामे खूप त्यात हा उपद्व्याप कोणी वाढवावा?
बरोबर जितके कराल तितके काम वाढते.

घरची मोलकरीण सांभाळणे. तिला कामात तज्ञ करणे, तिला तू माझ्या घरची म्हणून वेळोवेळी पैसे, मदत करणे. एव्हढे करूनही ती टिकेल म्हणून खात्री नाही. मोलकरीण सांभाळता येतीय का म्हणून आपले मोजमाप सहज करून देणे होय. घरात मेड असली तरी गृहिणीचा कामात पिट्ट्या पडतो. माझ्या घरीही काही काळ अशी परिस्थिती होती. पण बरेचसे काम हलके निश्चित करता येते. काही उपकरणाचा उपयोग करून फक्त मानसिकता हवी आणि आर्थिक नियोजन हवे.

भांड्याचा ढीग हि डोकेदुखी सर्व घरची ठरते. सोय करता येत असेल तर जरूर करा. घरच्या स्त्री ला आराम मिळवून द्या. आणि स्त्रियांनी मोलकरीण सांभाळता येतीय का ऐकण्याचे टाळू शकता.

होय मी माझ्या यक्ष संबधी म्हणजे माझ्या मदतगार विषयी माझ्या Dishwasher बद्धल लिहितेय…….. नोकरी करणारी असो नाहीतर घर स्वीकारणारी यक्ष प्रश्न आहेत. लहान मुले असली तर वारंवार खाणे करावे लागते, मोठी असली तर अजून काहीतरी वेगळे कर, पाहुणे येणार तर खास बेत, घरची मंडळी असली तर…. एकंदरीतच घरातील स्वयंपाक घर दिवसभर कार्यरत असते. कामवाली बाई एकदाच येते. हा भांड्याचा ढीग तयार होतो. थकवा जाणवतो, कामाचा डोंगर पाहून नवऱ्याची काळजी वाढते. मग आधुनिक अद्यावत यंत्रा चा उपयोग केला तर…… पाहिजे तेंव्हा, हवा त्या वेळी उपयोग करता येतो. घरोघरी कपड्याचे मशीन असते, तसेच हे भांड्याचे मशीन आहे. मी खूप वर्ष वापरते. अजून भारतात कामवाली सहज उपलब्ध असल्याने भांड्या करता मशीन घेण्याची मानसिकता घरोघरी दिसत नाही. किमंत हि साधारण पणे कपड्याच्या मशीन च्या जवळपास आहे. तसेच आता भारतात हि खूप ठिकाणी दुकानात दिसते.

घरचे काम करून हात दुखतात, थकायला होते मग हे पर्याय कामवाली बाई चे प्राबल्य कमी करतात. मला उपयोग होतो. तसाच सर्वाना व्हावा म्हणून हि पोस्ट. निदान एक काम तरी हलके होते. घर आनंदी राहते. मला आपल्या शंका, प्रश्न जरूर विचारा, माझे म्हणणे नक्की पटेल. तुम्ही आनंदी तणावमुक्त तर घर आनंदी राहते. गृहलक्ष्मी ला यक्ष प्रश्नात मदत करणारा यक्ष ठरेल.

Next Newer Entries