आपण सिनेमा बघायला जातो तेंव्हा उशीर झाला तर एकमेकांना पकडत, विजेरी किंवा पायऱ्यांच्या दिव्याचा उजेड ह्यांचा आधार घेत कोणाच्या मांडीत बसण्याचे दिव्य घडणार नाही. ह्याची चाचपणी करीत बसतो. तसाच किंबहुना त्यापेक्षाही अधिक काळोख पण अनोखा अनुभव आम्ही ऑस्ट्रिया येथे जिप्सम खाणीत घेतला. व्हिएना ह्या ऑस्ट्रियाच्या राजधानी शहरापासून १७ की.मी अंतरावर सीग्रोत्ते ही खाण प्रवाश्यांचे प्रमुख आकर्षण आहे. जिप्सम जे शेती करिता खतांसाठी वापरले जाते. सिमेंट तसेच प्लास्टर ऑफ प्यारीस चा प्रमुख घटक आहे. येथे लाल, पांढरे व करडया रंगांचे जिप्सम सापडत होते. १८४८ ते १९१२ पर्यंत ही खाण कार्यरत होती. १९१२ मध्ये ब्लास्ट केला आणि खाणीत २० मिलीयन लिटर पाणी वेगाने घुसले व खाण बंद झाली.
१९३० मध्ये खाण पुन्हा प्रवासी आकर्षण म्हणून तयार करण्यात आली. खाणीत प्रामुख्याने तीन स्तर आढळतात. सर्व स्तर जमिनी खाली फक्त ९ डिग्री सेल्सिअस तापमान मध्ये पाहावे लागतात. बाहेरून पाहिल्यास एक छान प्रवेश द्वार दिसते. आपल्याला कल्पना ही येत नाही. खाण कुठे आहे? आणी ह्या आकर्षक दारातून प्रवेश होतो जमिनी खालच्या काळोखात, येथे तापमान ९डिग्री सेल्सिअस असल्याने तुम्हाला छोटी घोंगडी सदृश रजई दिली जाते.
वाळूत बनवलेलं भुयार हे एक अप्रूप असायचे. खाण म्हणजे पण एक लांबलचक भुयार मणाचे, टनी वजनाचे असे अनेक लाकडी दरवाजे, आता उघडून ठेवलेले पण पूर्वी बंद असावेत. चारी बाजूनी अंधार पायापाशी छोट्या प्रकाशाची सोय होती पण चटकन चेहरे काही दिसत नव्हते. जवळ जवळ ४ ते साडे चार किलोमीटर खाण आहे. माहिती देण्यासाठी येथे गाईड दिला जातो. बरेच दरवाजे आम्ही थंड गार वातावरणात पार केले. प्रकाशाचे जग ठिपक्यात पण दिसत नव्हते. साहस करायचे जरा हटके बघायचे हा विचार असून देखील मनात जप करीत होते.
अचानक गाईड ने थांबवले, भुयारात जेंव्हा खाण कार्यरत होती तेंव्हा खूप लोक काम करायचे. २०० फुट जमिनीखालचे कामाचे ठिकाण अतिशय गूढ. निशब्द शांततेचे असे होते. आम्ही सर्वात वरच्या स्तरावर होतो. भिंतीत खोल्या केलेल्या होत्या. घोड्यांचे तबेले, प्रार्थनेची खोली, विश्रांतीची खोली, स्वयंपाकाचे ठिकाण जवळ जवळ एक पूर्ण वसाहत फक्त जमिनीखाली. काय करमणूक? कुठे परिवार? कसा घेत असतील मोकळा श्वास एक कुठेतरी झरोका दिसायचा. छे भयंकर स्थिती असते खाणीत, आपण मात्र जमिनीवर धनाढय होतो ते ही लोकांचे जीवन गाडून! आता सुद्धा थरारक वाटत होते. तिथे एक जागा वाईन साठी होती ह्याच जागेवर निशब्द जागेवरील खाण कामगार उत्सव साजरे करायचे. आनंदी ठेवण्याचा जमिनी खालचा हा अनोखा प्रयत्न. मानाने त्या सर्वांकरता सलाम केला.
काही खोल्या गेल्यावर पाण्याने भरलेले छोटे तळे, म्हणजे खोलगट जागा दाखवली. तिथे अंधार, हिरवा रंग ह्या पलीकडे मला काहीही दिसले नाही. गाईड म्हणाला अजून सुरवात झाली नाही. किती रहस्ये बघायची आहेत ह्याचा काही अंदाज येत नव्हता. प्रेअर च्या ठिकाणी आम्हाला थांबवण्यात आले. जे कोणी येथे गाडले गेले त्याकरिता प्रार्थना करा असे सांगण्यात आले. मी हात जोडून विश्व प्रार्थना मनात म्हणाले. तोच नेपाळी गाईड मला विचारतो फ्रॉम इंडिया? येस. आर यु मल्याली? सावळा रंग कसा दिसला ह्याला? हा विचार करत रागच आला. मुलगा मात्र खो खो हसत होता.
पुढे पुढे चालत होतो, आता म्हणे दुसऱ्या स्तरात आलो. काही पायऱ्या बनवलेल्या होत्या. तिथून खाली उतरायचे. खाली विस्तीर्ण असा जलाशय होता. पाण्यावर पूर्ण हिरवा रंग होता. लाइफ जाकेट देण्यात आली. २००४ ला बोटीचा अपघात झाला त्यात चार व्यक्ती मरण पावल्या. अरे देवा! आता हे काय संकट म्हणून लेकाचा हात घट्ट धरला. बेटा वडिलांबरोबर बिनधास्त होता. मीच मात्र स्वामी, साई, बापू यांचा धावा करत होते. पायऱ्या उतरून खाली गेले म्हणजे सगळ्यात खालचा तिसरा स्तर. हळू हळू एक बोट आमच्या कडे येत होती. काळ्या मिट्ट अंधारात डोलत होती. जवळ आल्यावर पाहिली आपली नल दमयंतीच्या गोष्टीतील किंवा दिलीप कुमार यांच्या चित्रपटातील हंसांची नौका मस्त सोनेरी रंगात आम्हाला घेण्यासाठी पायरी जवळ आणली गेली.
दिमाखदार बोटीतून प्रवास सुरु झाला.जमिनी खालचे तळे, खाण मानव निर्मित परंतु पाणी मात्र अजूनही अविरत येते. पंपाने उपसून घेतात. पूर्ण काळा अंधार, डोक्यावरती छतावर पहिल्या थराचे अजून एक तळे. काही ठिकाणी कमानी होत्या. त्याखालून नौका जायची, काही ठिकाणी छोटासा प्रकाशाचा ठिपका जाणवायचा. सर्व निशब्द: शांतता. घन गंभीर वातावरण, फक्त ९ सेल्सियस तापमान, पाण्यात हात घातला, थंड पाणी, चटकन बोटे गारठली. ह्याचे चित्रीकरण थ्री मस्केटीअर ह्या चित्रपटासाठी झालेले आहे. अनोखे दृश प्रत्येक टप्प्यावर होते. पाण्यावर पडलेले बोटीचे प्रतिबिंब बोटीवरचा कंदील दाखवत होता. भिंतीवर वेगवेगळ्या छटा निर्माण झालेल्या होत्या. कधी उंच अशा एकाद्या कोपऱ्यात पाणी चमकताना दिसायचे. मंद असे प्रकाशझोत सौन्दर्य अजून वाढवत होते पण अंधाराचा डौल कुठे ही बिघडवत नव्हते.
अर्धा तासाहून अधिक काळ बोटीत होतो. पायऱ्या चढून वर आलो. थोड्यावेळ पुन्हा टनेल पार केले. डोळे प्रकाशाने पटकन मिटवले. अजूनही स्मरणात राहिला निशब्द: करणारा युरोप मधील सर्वात मोठ्या जमिनीखालच्या तळ्यातील प्रवास. आज पर्यंत १०मिलीयन लोकांनी हे तळे पाहून झाले. गेल्या वर्षी २५०,००० प्रवासी येवून गेले. आम्ही पण तिघे त्यात आहोत. इतका विलक्षण अंधारातला प्रवास तो ही पाण्यातील. जिथून प्रवेश केला. तिथेच कॉफी घेतली. परतीचा प्रवास बस मध्ये अबोल पणे केला. कारण मन भरून व्यापून राहिला जमिनीखालच्या तळ्यातील……रोमांचकारी अनुभव.
नोव्हेंबर 30, 2009 @ 21:53:02
खूप रोमांचकारी अनुभव, छान मांडलाय!!
नोव्हेंबर 30, 2009 @ 22:25:11
श्री. आनंद पत्रे, आपले स्वागत! धन्यवाद.
डिसेंबर 01, 2009 @ 00:06:30
छान आहे पोस्ट. एक वेगळा अनुभव, मोजक्या पण योग्य शब्दात. कधी गेला होता ते लिहिलं नाही पण माहित पडलं तरी चालेल…उगीच कुतुहल म्हणून….:)
डिसेंबर 01, 2009 @ 09:20:05
अपर्णा,
आम्ही दोन वर्षापूर्वी जुलै महिन्यात ऑस्ट्रिया, इटली बघण्यासाठी गेलो होतो.
डिसेंबर 01, 2009 @ 00:19:47
आम्हालाही जमीनीखालच्या तळ्याची छान सफ़र घडवलीत…
खाणीतले लोक अश्या जागी तासोंतास कशे काम करत असतील याचे आश्चर्य वाटते.
डिसेंबर 01, 2009 @ 09:26:08
देवेंद्र,
आपल्याला खरच कल्पना नसते.थोड्याशा कष्टाने पण आपण वैतागतो, कष्टकरी जीवन तेही खाण कामगारांचे जवळून पाहून नतमस्तक झालो.
डिसेंबर 01, 2009 @ 05:19:20
I can only echo Shri Anand Patre’s comment.
Great write-up. Enjoyed reading it thoroughly.
It deserves to be anthologized.
– dn
डिसेंबर 01, 2009 @ 09:29:06
Welcome! Mr.dn,
Thank you for your nice comment.
डिसेंबर 01, 2009 @ 08:03:52
sahi aahe tuza anubhav kharach kase kam karat astil na te khan kamgar ……. tya mana ne apan kharach khuppppppppppppppppp sukhi aahot thanks to GOD !!!!!!!!!!
डिसेंबर 01, 2009 @ 09:37:31
अश्विनी,
आम्ही पण ह्या अनुभवामुळे उमेद घेवून बाहेर पडलो.खाण कामगारांचे काम अतिशय कष्टप्रद असते.
डिसेंबर 01, 2009 @ 10:55:04
ajabach aahe jaminikhalache tale. vienna javal ase kahi aahe he mahitach navhate. pan itakya khali hava khelati kashi rahate? andhaaraat, bandist jaget kase kaam karat asatin khan kamagar !
डिसेंबर 01, 2009 @ 14:56:51
गौरी,
व्हिएन्ना ला जाशील तेंव्हा पाहून ये. खरच अनोखा अनुभव येतो. मला असे वाटते की हवे साठी पाईप असतील.हवा खेळती राहण्यासाठी अशी सोय असते.
डिसेंबर 01, 2009 @ 14:39:10
जमिनीखालचे तळे
वाटे झाडाच्या मूळआनाच आली फळे..
जीव असे स्थळ पाहण्यास तळमळे…
तुमच्या ब्लोग मधूनच आमचे स्वप्ना असे उजळे
छान लेख आहे… अनुभव सुंदरच असेल न?
डिसेंबर 01, 2009 @ 14:51:30
अखिल,
अरेव्वा! मस्तच जमली आहे प्रतिक्रिया. अनुभव पण छान होता.
डिसेंबर 02, 2009 @ 05:13:23
खुपच सुंदर… इतकी सुंदर माइन्स बघुन बरं वाटलं. आम्हाला आपल्या कोळशाच्या आणि मॅंगनिझ च्या खाणी बघायची सवय ,. खुपच ओघवती भाषा.. सुंदर जमलंय पोस्ट..
डिसेंबर 02, 2009 @ 09:25:52
महेंद्रजी,
आपण इथे कधी याल ह्याची वाट पहातच होते. चला म्हणजे हळू हळू का होईना लिखाण जमेल अशी आशा वाटते. आम्ही तर कधी कोळश्याची
खाण सुद्धा पहिली नाही नुसती अभ्यासली. पण ही खाण खरच अनोखी आहे.
डिसेंबर 02, 2009 @ 20:14:44
आपण खूपच रोमांचकारी अनुभव घेतलेला दिसतो.