अशी मी ….आणि अशी माझी मुंबई

माझी प्रोफाईल……. २६/११ साठी,

आपली जन्मभूमी ह्याचा अभिमान असणे हे सहजीच आहे. कर्मभूमी पण तेव्हढीच जवळची असते. आपल्या आयुष्यातले चढ उतार, भावनिक, मानसिक धागे दोरे हे आपल्या गावाशी, शहराशी वेढून असतात. मी मुंबईची म्हणून मला माझ्या शहराने मोठे केले. त्या शहराला माझे शिक्षण, माझे अनुभव आज अर्पित करते. ते ही २६/११ ला कारण ही तारीख माझ्या मुंबईची आहे. भारतच काय पण सर्व जग जणू काही दहशतीने वेठीस धरले होते. त्यातून माझी मुंबई ही कायम टार्गेट असते. हा मुंबईच्या इतिहासातला काळाकुट्ट दिवस पण पोलिसांनी, कमांडोज, ह्यांनी निडरपणाने मुकाबला करून दहशतवाद्याचा बिमोड केला. गतिमान, धाडसी, संवेदनक्षम, हळवी, विचारी अशी माझी मुंबई.

मी मुंबईत जन्मले, शिक्षण, करिअर सर्व काही मुंबई. माझी प्रोफाईल ही मुंबईचाच घटक आहे. जन्म घाटकोपर, शाळा ठाणे, कॉलेज रुइया ह्या परिघातच मी मोठी झाले, भक्कम बनले, सक्षम, उच्च विद्याविभूषित, संवेदनक्षम बनले.

शाळेत असताना पोहणे, मैदानी खेळ ह्यात मला आवड होती.कॉलेज ला गेल्यावर एन. सी. सी. जॉईन केले. मला यु. पी. एस. सी, किंवा आय. पी. एस. परीक्षा देवून आय. ए. एस. किंवा पोलीस ऑफिसर बनायचे मी ठरवले होते. एन. सी. सी. चे प्रशिक्षण चालू असताना अनेक पारितोषिके पटकावली. ऑल इंडिया लेव्हल मिलिटरी चे सिग्नल यंत्रणा करिता अखिल भारतीय श्रेणीचा प्रथम क्रमांकाचा चांदीचा कप मला मिळाला. महाराष्ट्र प्रतिनिधित्व करण्याची संधी मला राजधानीत मिळाली. सर्व ठिकाणी मेरीट होल्डर झाले. फायरिंग, हॉर्स रायडींग, स्युबा डायविंग, प्यारा सेलिंग, ह्या धाडसी प्रकारात अव्वल नंबर टिकवून होते. कॉलेज व एन. सी. सी तर्फे महाराष्ट्रातील सर्व डोंगर, किल्ले ट्रेकिंग करून पाहून झाले.

शिवाजी मैदानावर परेड च्या दरम्यान हेमंत करकरे ह्यांच्याशी बोलण्याचा योग आला होता. आपण प्रशासकीय सेवा करिअर करता निवडा असे मोलाचे मार्गदर्शन त्यांनी मला केले होते. पण मराठी तरुणांचा तेंव्हा फारसा सहभाग नसायचा. लग्न करून ज्या ठिकाणी सासर असेल तिकडे जायचे असे पुरोगामी विचारांचा पगडा मुलीं भोवती असायचा. मला काही फारसे प्रोत्साहन मिळाले नाही त्यामुळे त्यांना प्रयत्न करते असे म्हटलेले पूर्ण होऊ शकले नाही. मी शिक्षण क्षेत्र करिअर करता निवडले. शाळा ते महाविद्यालय इथे शिकवत राहिले. गाईड चे ट्रेनिंग घेवून आपत्कालीन उपाययोजना, क्याम्प घेवून विद्यार्थ्यांना शिकवल्या.

आज माझे अनेक विद्यार्थी मी सुचवलेल्या प्रमाणे प्रशासकीय परीक्षा देवून रुजू झाले आहेत. मी पूर्ण करू शकले नाही. पण माझ्या विद्यार्थ्यांच्या रूपाने आज करकरे साहेबाना सलाम करते. काही पोलीस ओळखल का टीचर? म्हणून समोर येतात. माझे जे कार्यक्षेत्र आहे ते पुढच्या भावी पिढीचे आहे. त्यामध्ये मी करकरे, साळसकर असे अनेक शूर वीर पाहते.

आम्हा स्त्रीयांना सकाळी एक व्यक्ती अश्लील हावभाव करून रस्त्यात त्रास द्यायची. दहा जणी असूनही सर्व तिकडे दुर्लक्ष करायच्या. मी पोलिसांना फोन करून सांगितले व सर्वांची सुटका झाली. रस्ता निर्वेध बनला. पोलिसांची गस्त सुरु झाली तेंव्हा जाणवले की घेतलेले शिक्षण वाया जात नाही.

एन. एस. एस मध्ये पण सहभागी झाले. अल्प उत्त्पन गट निवडून कांजुरमार्ग विक्रोळीच्या डोंगरा वरच्या झोपडपट्टीत काम केले. मुंबईचे हे जीवन ही फार जवळून अनुभवले. त्यांनी दिलेला प्रेमाचा चहा, आग्रह, आमच्या गटाने त्यांना घरगुती रोजगार करता साधन सामुग्री, शिक्षण देण्याचे काम केले. त्या कुटुंबांचा चेहऱ्यांवर दिसणारा आनंद मला आज आठवला.

अंतर्मुख होऊन विचार करते तेंव्हा हे निश्चितच पटते की आपल्या भूमीचा आपण मोठे होण्यात खूप महत्वाचा हिस्सा आहे. २६/११ च्या भीषण हल्ल्यात नागरिकही खूप मोठ्या प्रमाणात बाहेर येवून मदत करीत होते. पुरात पहिले की एकमेकांना वाचवण्यासाठी शर्थ करीत होते. पाण्यात अडकलेल्या लोकांना अन्न, वडापाव, पाणी सर्व काही घरासारखे देत होते. कोणी कोणाचे नव्हते होते ते फक्त मुंबईकर. ह्यांच्या पण प्रत्येकाच्या प्रोफाईल मध्ये एक मुंबई आहे. निर्भीड, कणखर, हळवी, गतिमान व वैव्हीध्य अशा शिक्षणाने परिपूर्ण असलेली. कितीही संकटे आली तरी न डगमगता धीराने सामोरी जाणारी, बदल स्वीकारणारी, प्राप्त परिस्थितीत पण योग्य मार्ग काढणारी.

मी मुंबईचे प्रतिनिधित्व करते. मुंबईचे लोक जगात कुठे ही मजेत राहू शकतात. भारतात येताना विमानातून झोपडी दिसली कसे आलबेल आहे ते जाणवते. सगळ्यांना सामावून घेतले. भले वाद असतील पण संकट काळी सर्व मुंबईकर असतात. पोलीस अधिकारी ते सामान्य व्यक्ती २६/११ ला एकमेकां करता अश्रू डोळ्यात ठेवून. जे राहिले आहेत त्यांच्या करता मदत करीत होते हे जेंव्हा परदेशी बसून आम्ही टी.व्ही. वर पाहत होतो तेंव्हा मुंबईचा अभिमान आमच्या डोळ्यात पाण्याने भरून गेला.

आम्ही नाही मदत करायला ह्याचे वाईट वाटले. इकडून पैसे, कपडे, धान्य वैगरे मदती करता पाठवतो. पण बॉम्ब स्फोटात मदत कार्य, पुरात भुकेल्याच्या पोटी अन्न, वाचवण्या करता हात इकडून पाण्यात नाही देवू शकत. हात जोडतो ३३ कोटी देवांना की माझ्या मुंबईला, भारताला वाचव संकटातून.

आपल्या आयुष्याची प्रोफाईल म्हणजे आपली जन्मभूमी होय. मी मुंबईची म्हणून तिची व माझी जीवनरेखा सारखी वाटते. अशा मुंबईला सलाम!!!!

More