तिचा व माझा फोन…………

आमच्या दोघींचा मैत्रिणींचा फोन म्हणजे एक प्रचंड उत्सुकता अहो न ची होती, मुलगा पण म्हणायचा घरात राहून तुम्ही इतके काय बोलता. तसा आमचा फोन एक दिवसा आड असतोच. सर्व विषय समावेशक, असे हे चालते, ब्लॉग आहेत मुलांच्या समस्ये पासून ते समाजकारणापर्यंत. मोलकरीण समस्या, नवऱ्याच्या आवडी, स्वभाव, नातेवाईकांचे अनुभव. नवीन आलेले सिनेमा, नाटके सध्या चालू असलेले घडामोडी. भारतातील राजकारण, शेजारणीच्या गुजगोष्टी, सोन्याचे भाव, भाजीचे भाव, जमेल तर एखादी रेसिपी, मुलांचा शाळेचा डबा, खरेदी, आजार, इतर मैत्रेणींची चौकशी, ब्लॉगचे विषय.अनेक विषय असतात.

ह्यांना कुठून सुरवात झाली व कुठपर्यंत बोललो काय काय सांगणार? सुरवातीला विचारायचे पण आता काहीच बोलत नाहीत. फक्त बिल किती होईल याचा सुज्ञ विचार करा, खर आहे. पण इथे घरात बसून दुसरे छंद पण जोपासता येत नाहीत. हा फोन म्हणजेच एक दिलासा आहे. नेटवर सर्व सुविधा आहेत पण कानाला फोन लावल्याशिवाय घरच्या सारखे वाटत नाही कारण संवाद विनाखंड असावा लागतो. नेट वेब चा आधार घेवून भारतात बोलायचे व कानाला फोन लावून विनाखंड बोलायचे ह्यात फरक आहे.

अजुन दुसरा फोन येतो तो आईचा भारतातून फोन. रात्री वेब वर भेटली तरी त्या फोन ला काही अर्थ नाही. म्हणून दोन दिवसात पुन्हा फोन येतोच. तिकडच्या नातेवाईकांची लग्न कार्ये, समस्त वृतांत सांगायचा असतो. माझ्या लेकाची शाळेची परीक्षा असली तर त्याला ‘भीमरूपी’ म्हणायला सांग पासून ते त्याचा अभ्यास कसा चालला आहे तिथपर्यंत, फोन वर त्याचा आवाज जर बरा वाटला नाही तर सल्ल्यांची ही भली मोठी यादी फोन वर देते. आता मला त्याच्या बरोबर असायला हवे होते म्हणून खंत व आम्ही आईवडील तिच्या नातवंडा कडे दुर्लक्ष करतोय का असा जवाबदारीचा धाकाचा फोन येतो. जावयाशी त्यांचे ऑफिस, तब्येत ह्या गप्पा तर चालतातच.

दिवाळीत तर फोनवर लाडू, चकली ह्यांची रेसिपी असतेच अधिक भरीस भर म्हणजे मी पण काही स्वयंपाकात गोंधळले तर लगेच फोन करते. ‘हे’ लगेच म्हणतात की, ह्यापेक्षा भारतात जावून खावून आलो तर स्वस्त पडेल. पण अडचणीला पहिली आईच आठवते ना!
माझ्या कडून काही कारणामुळे मुलगा दुखावला गेला असला, तर दुसऱ्या दिवशी हमखास तिचा फोन ठरलेला. नातवंडा चा मेसेज पोहोचलेला असतो रात्रीच. अशा वेळी तिचे व माझ्या मुलाचे सिक्रेट असते दोघेही पत्ता लागून देत नाहीत. मला मात्र आईकडून सज्जड दम तर मिळालेलाच असतो वरून ह्यांची बोलणी बसतात.

आता सुट्टीला भारतात एकटा निघालाय. आपण किती मोठे झालोय हे सतत आजमवायचे असते. आम्हाला ही धाकधूक आहेच. पण आईचे दोन दिवसात सूचनांचे इतके फोन आले की, त्या पेक्षा मी गेले असते तर बरे. अजूनही फोन चालूच आहेत. ठरवून फोन करूया असे कलम मान्य झाले तरी चार दिवसात पुन्हा फोन. फार नको बोलूस तुझा आवाज ऐकायचा होता. आईच्या माये ला जगात तोड नाही हेच खरे.

हा तिसरा सुद्धा फोन महत्वाचा कारण तिने मला मिस कॉल केला की समजावे की मेड ची आज दांडी आहे. इथे हे सुख आहे की त्या फोन करून तुम्हाला कळवतात. हा फोन काम वाढवतो.

अजूनही असे मिस कॉल येतात की, आपले बिल वाढवतात. काही मैत्रिणी आमच्या घरी फक्त इन कमिंग आहे. कारण आमची मुले लहान आहेत, केंव्हाही बटने दाबतात व राँग कॉल करतात. तुम्हीच करा. काय बोलणार कप्पाळ? करते मी लाजे खातर. माझे मुल लहान होते का? हा प्रश्न पडतो. बर करावा तर, त्यांच्या बाळाचे कौतुक करण्यावर माझे फोन बिल वाढते.

आम्हाला ही कौतुक आहे, पण ह्या तर गळ्यातच पडतात. माझे ही बाळ असेच वाढले व अजूनही कौतुक करावे असे खूप काही त्याच्या कडे आहे. पण अतिरेक झाला की, हास्यास्पद वाटते. त्यांचे बिल नसते माझे असते. मैत्रीण म्हणून करावा तर ह्यांची वंशावळ माझा निदान एक तास तरी घेते. मिस कॉल का करतात? पैसे नाहीत तर ठीक आहे. हे बोलणे पण नागाच्या विषापेक्षा जहरी होते. एखादा मिस कॉल ठीक पण ह्यांच्या मुलाला मिश्या फुटल्या तरी स्वताचा पैसा घालणार नाहीत. पण मी पण समजून घेते की, आई होऊन त्यांचे प्रेम मला सांगणार नाहीत तर कुणाला? मलाच चैन पडत नाही, की बरेच दिवसात खबरबात नाही मिळाली तर काळजी वाटते. कारण मैत्रीण म्हणून मी स्वीकारले आहे. त्याचा फायदा घेते हे दिसत असूनही मीच बिल भरते.

पहिला फोन करणारी मैत्रीण अशी आहे की आंम्ही दोघीही आलटून पालटून फोन करतो कारण आमची मैत्री आहे.एकमेकीना चैन पडत नाही त्याकरता आम्ही आमच्यावर कुठलाही खर्च फक्त स्वता करता करीत नाही. घरच्या बजेट मध्ये बसवायचे असते. आणि आमचे दोघींचे अहो पण आमच्या मैत्री करता खुश असतात. आईचा येणारा फोन हा तिच्या एकटे राहण्याकरता खूप गरजेचा आहे. लेक, नातवंड व जावई हे तिच्या पासून दूर आहेत. आम्ही इकडूनच त्याचे बिल ऑन लाईन भरतो. ह्या बिला मुळे आम्हाला आई चा दिलासा आहे हे जाणवते व सुरक्षित वाटते. आम्हा कोणालाही इकडे बरे नसले की त्या दिवशी आईचा फोन काळजीचा येतो, व म्हणते, काल रात्री पासून चैन पडत नाही. तुम्ही ठीक आहात न. हिला बरोबर कोणीही न कळवता कळते हीच आईची टेलीपथी, अनेक बिल भरण्याचे बळ देते. आईने आपल्याला वाढवले म्हणून कुठलेही बिल लावलेले नसते.