ऋणानुबंध………

सकाळी फिरण्या करता बाहेर पडले. काही मैत्रिणी मुलांना शाळेच्या बस करिता सोडवायला आल्या होत्या. रस्त्याच्या कोपऱ्यावर बरीच गर्दी गोळा झाली होती. सगळे पुरुष होते, त्यातल्या काही जणांचा घोगरा आवाज घाबरून ओरडल्या सारखा होता. त्यातले काही जण एक पायावर उडया मारल्यासारखे पटापट पाय वर उचलत होते. व्यायामाची जागा नव्हती. आम्ही तमाम आई वर्ग आश्चर्याने बघत, अंदाज घेत होतो. आमची काही धिटुकली बाळे, सूचना न जुमानता पुढे गेली. क्षणाधार्त पळत माघारी आली, ते ही किंचाळत. मम्मा, डॉगी चे बाईट करणारे पिल्लू आहे. बस आली आयांनी पोरे ढकलली. स्वताही धूम ठोकत आत पळून गेल्या. मला काही कळायच्या आत माझा पाय घोट्याजवळ घट्ट धरला गेला. धारदार दात मला जाणवत होते. त्याचे अंग पूर्णपणे थरथरत होते. मागून माझ्यामैत्रिणींचा किंचाळ्या ऐकू आल्या. चावले! चावले!. पिल्लू अजून घाबरले. मला काळजी होती कर्र कर्र आवाज येत होता खरेच चावले तर, किती सुया बसतील.

मला कुत्रा पाळल्याचा अनुभव आहे. माहेरी ‘पाशा'( जर्मन शेफर्ड) होता. आता मार्शल हाही जर्मन, सनी हा रॉट जातीचा, माझ्या मुलाकरता ‘ज्याकी’ हा पॉम पिल्लू असल्यापासून आमच्या बरोबरीने घरात होता. ह्यांना पण लहानपणी पासून आवड व घरात पाळला होता. त्यामुळे मी ह्या चावऱ्या वेड्याला अलगद माझ्या पायापासून सोडवले. जवळ पोटाशी धरले. कोणीतरी चावरे म्हणून सोडून दिलेले असावे. माणसांचा खूप राग होता. नीट वागवले नसणार. बिलगून बसले. मैत्रिणी अग सोडून दे म्हणून कलकलाट करू लागल्या. खिडकीतून मुलगा बघत होता. आपण पिल्लू आणू या म्हणून अजूनही दंगा करतो, त्याला तर ही पर्वणीच होती. धावत खाली आला, येताना बिस्कीट चा पुडा, पाणी देण्यासाठी वाटी घेऊन आला. तो जवळ आला की, ह्या पिल्लाने हातातून खाली उसळी मारली व मुलाचा पाय पकडला. आता मात्र मी पुरतीच घाबरले. उगाच कनवाळू झाले असे क्षणभर वाटले. त्याचा पाय जबड्यातून सोडवला. खायला दिले. पटापट संपविले.

आई, घे न घरात, तोच त्याने दात फिस्कारून दाखवले. आई, हे का ग चिडले? कदाचित त्याला अनुभव वाईट आला असेल. आपण नाही पाळू शकत. दोन महिने आपण भारतात जातो. तिकडेही सगळीकडे फिरतो, इकडे डॉग सीटर कडे सोडावे, मला नाही जमणार. तू मावशीकडे गेलास की खेळ, मार्शल, सनी, काळू आहे ना. त्यांच्या कडे सोडू. नको बाळा, मी समजूत काढत होते. माझ्या कडेवर बसून पिल्लू ऐकत होते. चल आता घरी जावू, हे इथेच खेळत राहील. मी त्याला खाली सोडून, त्याचे लक्ष नाही असे पाहून मी वरती घरी गेले. बिल्डींग ४० फ्ल्याट ची, टोलेजंग, एका मजल्यावर एक विंग ला ओळीत ५ घरे, मध्ये लांबलचक प्यासेज आहे. इकडच्या बाजूला दोन घरे व प्यासेज ला काच असलेले दार, तसेच दुसऱ्या बाजूला. मध्ये एक घर त्यासमोर जिना व लिफ्ट. अशी रचना, दोन्ही विंग पुन्हा अश्याच प्यासेज ने जोडलेल्या.

दोन तासानंतर घरची बेल वाजली. दारात सोसायटीचा केअर टेकर उभा होता. म्याडम, कुत्ते का बच्चा आपके घर है? नही, बच्चा अभी तक बाहर गया नही. नही, परेशान किया सबको, काटने को आता है. अभी छुप गया है. इधर पुलिस को बुलाना पडता है. ऐसा कानून है. फिर कुत्ता पकड्ने वाला आता है. लेकर जाता है. बहोत काटा तो, मारते है. पक्का मालूम नही. मी जाम काळजीत पडले. चलो धुंडते है. बाहेर आले तोच हे वेडं पुन्हा येवून पाय घट्ट पकडून बसलं. हे माझे घर शोधत इतके वर आले? म्याडम, पकडके रखना मै बॉक्स लेके आता हुं. डाल देंगे अंदर. बोलायचा अवकाश, हे पात्र इतके हुशार की त्याच्या अंगावर गेले धावून. केअर टेकर ने प्यासेजचे दार बंद करून कोंडून घेतले. मी मान डोलावली होती, आता त्याचा विश्वास पण गमावून बसले. माझ्यापासून दूर दूर पळून जावून रडून दाखवत होते.

दाराच्या पलीकडे केअरटेकर, त्या दारापलीकडे मैत्रिणी व मध्ये आणि पिल्लू. येरे बबड्या म्हणून मी चुचकारत होते. माझ्या मनातील ओळखून की, मी त्याला सांभाळणार नाही व पकडून देणार म्हणून ते उद्धवस्त चेहेऱ्याने मला फक्त बघत होते. सोसायटीत ते प्रत्येकाच्या अंगावर दात दाखवून धावत गेले व मी एकच अशी होते की, त्यांनी मला काहीही त्रास दिला नाही. त्यामुळे त्याला पकडायची जवाबदारी माझ्या वर होती. मी ह्यांना फोन केला, एक दिवस त्याला ठेवून घेवू या का? हे ठामपणे नाही म्हणाले. नको गुंतूस पुन्हा, आपण परदेशी राहतो. युरोप सारखे फ्रीडम नाही. बीच, गार्डन, काही रस्त्यांवर फिरवायला परवानगी नाही.

कोणीतरी चादर फेकली. पकड़ा त्याला. पिल्लू ने चादर तोंडात पकडली माझ्या समोर टाकली. मला रडूच कोसळले. आपण रागवायला जावे, तर बाळाने हातात पट्टी आणून ठेवायची, असे झाले. कित्ती! ग शहाण माझं छबड! काय करू बाळा मी. ये रे जवळ. ते ही भोळं आल लगेच. कुशीत घेतल. हळूच बॉक्स मध्ये ठेवले. केअर टेकर ला म्हणाले, मेरे पेहेचान की एक संस्था है. वो लोग कुत्तेका बच्चा लेकर मुफ्त मे अच्छे घर मे भेजते है. बॉक्स वरून ओपन होता. मी मुलाला क्लासला पोचवायला गेले. दहा मिनिटात परत येणार होते. आल्यावर बास्केट मध्ये ठेवू. रस्त्या पर्यंत पोचते तोच, पोलीस गाडी पहिली. अंदाज आला की कोणीतरी फोन केला असेल. मी लगेच मागे वळले, मुलाला म्हटले की जा तू एकटाच क्लासला.

सोसायटीच्या गेट मध्ये पहिले तर पिल्लू बाहेर पळत आलेले होते. लगेच पोलिसांनी त्यावर जाळे टाकले. उचलले व घेवून गेले पण. मी रिकाम्या डोळ्यांनी पाठमोऱ्या गाडीकडे पाहत राहिले. केअर टेकर म्हणाला कुत्तेका बच्चा, आपके पिछे दोडके आया. पुलिस का स्मेल शायद मालूम पडा होगा. कोनसा थाना? मै जाके लेके आयेगी. म्याडम वो तो मालूम नही. पाय जड होणे म्हणजे काय ते समजले. वर येवून फोन वर खूप विचारले. काहीही पत्ता लागला नाही. खूप रडले. काय होता त्याचा आणि माझा ऋणानुबंध, कित्ती माया होती त्याच्या मनात, हे दुष्ट जग त्याला जगू देईल का?

खूप दिवस जेवण गेले नाही. सारखे वाटायचे कुठूनतरी मला शोधत येईल. पण बरेच महिने झाले ते काही परत आले नाही. एक दिवस घरी काम करणारी मेड आली म्हणाली मला आता गावी जायचे आहे. माझ्या बहिणीचे मुल हरवले आहे. मिळत नाही. मला क्षणात पिल्लू आठवले, त्याचे माझे नाते काही तासांचे होते. आपले मुल म्हणजे आपला श्वास तोच हरवला तर, जगायला उमेद कुठून मिळणार? एकटे असणाऱ्या आजी आजोबांच्या डोळ्यात रिकामे पण दिसते. जगात कुठे तरी, त्यांचे पिल्लू नोकरी करता लांब गेलेले असते. सध्या वेळ मिळाला की डॉग सीटर कडे जाते, मालक गावाला गेल्यामुळे ते तिथे राहतात. त्यांना भेटून, त्यांचे लाड करून येते. ते माझी वाट पाहतात त्यांतूनच मी माझ्यातले पिल्लू जपते. नाना नानी पार्क मधले आजी आजोबा पण एकमेकांचे साथीदार बनलेले असतात तेंव्हा जाणवते की, नवीन जीवनाची सुरवात झाली आहे.

6 प्रतिक्रिया (+add yours?)

  1. Arvind
    नोव्हेंबर 21, 2009 @ 21:54:20

    Plz don’t kind of stories…it hurts

    उत्तर

    • anukshre
      नोव्हेंबर 21, 2009 @ 22:22:29

      अरविंद,
      आपले स्वागत. आपण संवेदनशील आहात. असाही ऋणानुबंध, आयुष्याकडे बघण्याचा एक तरल, सूक्ष्म पण व्यापक असा दृष्टीकोन देतो.थोडेसे हलके मन होण्यासाठी भीत्या पाठी ….ही पोस्ट वाचा. खो खो
      हसणार नाहीत, पण एक हास्य लकेर निश्चित आपण अनुभवू शकाल. कळवा, मजेत रहा, कुटुंबाची
      काळजी घ्या.

      उत्तर

  2. gouri
    नोव्हेंबर 21, 2009 @ 22:34:46

    😦

    दिवसभर बंद घरात पिल्लू कसं ठेवणार म्हणून न उचललेली सगळी पिल्लं आठवली…

    उत्तर

    • anukshre
      नोव्हेंबर 21, 2009 @ 22:48:20

      गौरी,
      बंद घरातील पिल्लं पाहिली की त्या मालकांचा संताप येतो. तुमची हौस म्हणून प्राणी, पक्षी, मासे……. पाळा. पण त्यानाही भावना आहेत, जीव आहे ….हीच कळकळ वाटते.

      उत्तर

  3. Ashwini
    नोव्हेंबर 23, 2009 @ 07:17:42

    hmmm sakali sakali ekdam serious post boss chan lihile aahe mala vachun kase tari zale ….. tuzi avstha samaju shakte …………

    उत्तर

Leave a reply to Ashwini उत्तर रद्द करा.