पुरुष दिन……….शुभेच्छा!!!

पुरुष दिन……….शुभेच्छा .

आज शुक्रवार आमच्या कडे सुट्टी असते. रविवार सारखे जरा आरामात चालते. माझे अहो! मात्र रोजच्या सारखे ५ ला उठतात. मीच ७ वाजेपर्यंत ताणून झोपते. रोजचा सकाळचा चहा तयार असतो. कामाच्या दिवशी सगळे लवकरच उठतो. ह्यांना मात्र असे एक दिवस सुद्धा उशिरा पर्यंत झोप येत नाही. असो.

हॉलमध्ये चहाचा कप घेवून आले तर टी. व्ही. वर एक स्त्री आपल्या पतीला धपाधप बडवत होती असा व्हिदिओ होता. चर्चा सुरु होती….पुरुष दिन ची. ह्यांच्यावर स्त्रिया अत्याचार करतात. म्हणून कायदा बदला, किंवा अजून एक कायदा तयार करा. स्त्री ची बाजू दाखवत नव्हते. वकील पण सहभागी होते. कायदा काय आहे ते सांगण्याकरता. असो हा झाला प्रोग्राम सकाळी पुरुष दिन बद्धल……

आज सुट्टीचा दिवस, आणि साजरा करण्या करता घरच्या दीड पुरुषांचा विचार केला पाहिजे. आता एक माझे अहो! दुसरा मिशी फुटत असलेला माझा छोकरा हा अर्धा. तसा मुलगा लगेच म्हणतो कसा, मी का अर्धा? अरे बाळा तुला मिशी फुटायला लागली म्हणून. बाबा सुखावला पण मी मात्र माझे छोटेसे पिल्लू अजून जपते त्या करता तुला अर्धा ठेवला. सकाळी मी उठे पर्यंत हे घर बरेचसे आवरून ठेवतात. रात्रीची भांडी जागेवर जातात, दोरीवरचे कपडे घड्या करून ठेवतात. हे लहानपणापासून आईला मदत करत आले आहेत. माझी एक दिवसाची सकाळची झोप जपतात. कोशींबर करता काकडी, जमेल तेव्हढी भाजी चिरून ठेवतात. स्वयंपाक घरात ह्यांची लुडबुड चालू असते, एकीकडे माझ्याशी गप्पा करत असतात. माझ्या आईला, बहिणीला, माझ्या जावेला सगळ्यांना मदत करत असतात.एक तर स्वभाव खवय्या, आणि खिलवायला पण आवडते.

त्यातून ह्यांची रास ‘ कन्या ‘ म्हणजे राशी प्रमाणे बरहुकूम स्वभाव. तसा सुट्टी करता खास बेत, ह्यांचा वाढदिवस म्हणून, दीपावलीचा पाडवा, बहिणीचे भाऊ आहेत म्हणून भाऊबीज, आणि एक हो माझा वाढदिवस म्हणून खास बेत, आता पुरुष दिन.

मातृदिन, महिला दिन हे माझे डे आहेत न. पण ह्या मध्ये प्रमुख आचारी मीच असते. ह्यांची मदत असतेच, पण स्वयंपाक झाल्यावर पहिल्या घासाला ह्यांचा चेहरा फार बोलका होतो. हे दडपण पण मीच झेलते डोळ्यासमोर गोष्टी असल्या तरी हे जोरदार आरोळी ठोकतात, मिळत नाहीये तेंव्हा मीच तिथूनच काढून हातात देते. मी शाकाहारी ह्यांच्या करता मासे, चिकन करायला शिकले. त्यांच्या आवडी करता, प्रेमासाठी मीच बदलले. माझ्या आवडीकरता, सोयी साठी,मला बरे नसते म्हणून, मला कंटाळा आला म्हणून, हे हॉटेल मधून खूप वेळेला जेवण घेवून येतात. कारण त्यांना माहिती आहे, की आपल्या बाळ करता मी करियर सोडून घरातच असते. काम करण्याची सवय असली की पुरुषांना निवृत्ती नंतर काय? हा मोठ्ठा प्रश्न पडतो. छंद म्हणून काही जोपासायला वेळ मिळाला नसतो. म्हणूनही पोकळी पुरुषात लवकर तयार होते. स्त्री म्हणून ती घरात केंव्हाही राहून स्वताला रमवून घेते काम सोडून कसे चालेल? तुमच्या मागण्या कशा पूर्ण होणार? तुमच्या पगारात घर चालेल का? असल्या पुरुषी प्रश्न ती उध्भवूच देत नाही. घर सांभाळत राहते.

असा चाललाय संसार, असे होतात डे साजरे. परस्परांवर असलेला विश्वास, प्रेम, आपण एकमेकां करता आहोत. ही भावना, आपलाच अंश म्हणून आलेला छोटासा जीव, त्यांना वाढवण्यात पुन्हा जगलेले बालपण, आई वडील किंवा मोठी माणसे यांचा जिव्हाळा ह्यावर घर बुलंद, अभेद्य होते. घर ते समाज व पुढे राष्ट्र अशीच घडामोड अविरत असते. मदत करणे, एकमेकांना जपणे, भांडणे किंवा मत भिन्नता होणारच कारण दोन वेगळी माणसे कायम एकत्र राहण्यासाठी लग्न करून, एकाच छताखाली कुटुंब तयार करून राहतात. मुलगी एक दिवस आपले घर सोडून नव्या घरात राहायला येते तेंव्हा तिच्या सवई जपणे, तिने पण नवीन स्वीकारणे हे पती पत्नी दोन्ही बाजूनी सकारात्मक असावे लागते. तरच रोज पुरुष दिन, महिला दिन, व बालदिन घरात साजरा होईल.

मला अत्यंत आवडणारे एक गाणे लगेचच पाहायला मिळाले…..बम चिकी चिकी बम, चिकी बम बम, एक दुसरेसे करते है प्यार हम, एक दुसरे के लिये बेकरार हम, एक दुसरे के वासते मरना पडे तो है तैयार हम……

पोस्ट करता विषय सुचला, ह्यांनी फक्त आमटी भात कर म्हणजे तुला पोस्ट चे लिहायला वेळ मिळेल. आमटी मात्र परवा सारखी कर, मला खूप आवडली होती. अजून एकदा मला तशीच हवी आहे. ह्याच प्रेमा करता अनेक गोष्टी मी झेलायला तयार आहे. लेकाने पण, आई, खेकडा आज नको उद्या कर.आज तू लिही अजून काय हवे सांगा सगळ्यांचे असेच काहीसे अनुभव असतात त्यातूनच शिकायचे, एकमेकांच्या आनंदात सहभागी व्हायचे. आयुष्य सुखी करायचे. जगात चांगले, वाईट दोन्ही आहेत. आपल्याला दोन्ही बाजू नीट माहिती असतातच असे नाही. आपल्याला संसार आनंदी करायचा आहे, थोडेसे बदलूया, स्वीकारुया, हसत राहूया एव्हढेच आज.

पूर्ण परिवाराला पुरुष दिनाच्या शुभेच्छा . असा पुरुषांचा दिवस असतो, ह्याचा शोध आम्हाला आजच लागला.