सुखी, आनंदी…….घराचा मायना(दरवाजा) .

घरे बोलतात! अगदी खरे काय ते सांगतात. घरांच्या नावाच्या पाट्या खूपच बोलक्या असतात. तसेच प्रवेशद्वार पण बोलते. काही खुणा देते. घर त्या कुटुंबाचा आरसा असे म्हणतात. टापटीप ठेवलेल्या घरात पण सुख असते ,तसेच छुपे वादळ ही समजते. घराच्या प्रवेश द्वारा पासून सुरवात करू.

१) दाराचा उंबरठा—— स्टीकर ची रांगोळीची पट्टी लावलेला असला तर, पट्टीला मध्ये चिरा असल्या, कडेने फाटलेल्या असल्या तर त्या घरात नवीन फर्निचर घेतलेले असते. मुले, नातवंड असलेले घर समजावे. रोज त्यांची सायकल बाहेर जात असावी. खाते पिते घर असे असते, जिथे अभिरुची व तब्येत दोन्ही ला ही महत्व आहे हे लक्षात येते.

२) दाराच्या चौकटीचे चे तोरण केंव्हाही जा सुकलेले, आंब्याची पाने वाळून कडक झालेली दिसली तर घरात व्यस्त व्यक्ती अधिक असाव्यात. आर्थिक बळ दिसते. तोरण बदलून दुसरे लावण्या इतका वेळ पण ह्यांच्या पाशी नाही हे जाणून आर्थिक उलाढालीत असलेली व्यस्तता, आधुनिक, अद्यावत सूखसोइंचे हे घर आहे असे दर्शवते.
धूळ बसलेले प्ल्यास्टिक चे तोरण म्हणजे, पाहुण्यांचा राबता नेहमी असावा. दार कायम खुल्या मनाने स्वागत करत असणार. मित्र परिवारात, मैत्री चे मूल्य अधिक वरचढ असणार.

३) उंबरठ्याच्या बाजूला रांगोळीची छोटी गोपद्मे, स्वस्तिक असले तर ती स्त्री परंपरा जपण्याचा प्रयत्न करते असे जाणवते. आधुनिक स्टीकर व मांगल्य यांचे घराला घरपण दिसते. कालची रांगोळी भिंतीच्या कडेला ढकललेली आढळली नाही, तर स्त्रियांची संख्या जास्त असणार. नीटनेटके पणा नक्कीच समजतो.

४) घराच्या दारावर धूळ दिसली तर मंडळी व्यक्तीविकासाच्या पुरस्कर्त्या असाव्यात.

५)दारावरच्या बेल चे बटन मळके, हाताने पडलेल्या बोटांच्या ठशांचे असेल तर, आदराने स्वागत केले जाईल ही खुणगाठ मी बांधते.

६) दारासमोर असलेले पायपुसणे जागेवर असले म्हणजे, त्याचा एक कोपरा तिरका नसेल तर ओळखावे शिस्तीचे महत्व जपले जाते. पायपुसणे जिरून जुनाट वाटले तर थोरामोठ्या व्यक्तींचा हे घर मान राखते कारण विरलेल्या धाग्यातूनच हे पिढीजात असावे, असा माझा तर्क आहे

७) दारातून बाहेर पडणारी मुंग्याची ओळ दिसली की मी ओळखते प्राणीमात्रांवर प्रेम केले जाते. प्रत्येकाला आपला घास मिळतो. अन्नपूर्णा सुखी असणार.

८) दारावरच्या नावाच्या पाटीवर सौ व श्री अशी दोन्ही नावे या क्रमाने वाचावयास मिळाली की स्त्री दाक्षिण्य जपले जाते.

९) घरात वाचनाची आवड असावी, हे बाजूच्या भिंतीवर असलेल्या वर्तमान पत्राच्या नोंदी वरून लक्षात येते.

१०) दाराला अजून एक सुरक्षा दार असले तर प्रासंगिक, मानसिक भक्कमपणा जाणवतो..

११) दारावरच्या लाकडाच्या चौकटी च्या कोपऱ्यात, कोनावर कोळीष्टके दिसली, तर पाहुण्यांनी घर नेहमी भरलेले असावे. पाहुणचार व्यवस्थित होईल असा विश्वास वाटतो.

१२) सुस्वागतम् ची पाटी, मराठीत असली तर आवर्जून मातृभाषा आठवते, इंग्रजीत असली तर माझ्या इंग्रजी बोलण्याची चाचपणी मी मनात करते.

१३) चपलांची सोय, एखादे छोटेसे रोपटे, दाराजवळ असले की वास्तूशास्त्र व स्वच्छता यांचा अभ्यास केला आहे. इतर विषयांची चतूरस्त्रता घरात असावी हा आडाखा मी बांधते.
१४) दारावर स्वस्तिक, गणपती, किंवा इतर मांगल्याची चिन्हे असली तर देव्हाऱ्या चे संस्कार असतील ह्याची खुणगाठ मनी ठसते.

१५)दरवाजाला जर जाळीचे आय होल (म्हणजे नेत्र कटाक्ष स्थान) असले तर कटाक्ष एव्हढा संपर्क पण प्रस्थापित ठेवतील. म्हणजे पुन्हा येण्यास हरकत नसावी असा संदेश माझ्या मनाला मिळतो. जर प्य्लास्टिक चे धुरकट कडा तुटलेले भिंग बाहेरून दिसले तर मी समजते की, पुन्हा येण्याआधी अंतर्मुख होऊन विचार करावा लागेल.

१६) सदनिका क्रमांक—–
लाकडात असला तर दुसरी पिढी पण परंपरा जतन करते.
स्टील,अल्लुमिनिम असली, तर दीर्घकाळ उपयुक्तता ह्याला महत्व.
काचेची, लक्षवेधी असली, तर दारासमोर खेळण्यास बंदी असावी.

१७)भुकेची जाणीव देणारे, बाहेर पोचणारे पदार्थांचे सुवास स्वयंपाक निपुणता गुण देतात दाराच्या कोपऱ्यावर खाली सापडणारे उदबत्ती चे अस्तित्व, किंवा धुपाचा येणारा सुगंध संस्कार दर्शवतात.

१८) दरवाजाचा रंग किंवा पॉलिश हे त्या घरातील व्यक्तींचे स्वभाव दर्शवतात. सरळ, गहिरा, आनंदी, ह्याचा स्वतंत्र अभ्यास आहे.

१९) दाराची मुठ ही सुद्धा घरात राहणाऱ्या व्यक्तींच्या स्वभावाचे विविध कंगोरे उलगडते.

२०)दार फारच टापटीप असले तर वागणे, बोलणे संयमित करावे लागेल असे वाटते. अघळपघळ पणा करता येणार नाही. असा बिचकत अंदाज घेते.
असे घराचे दार बोलते, सांगते, समजावते. बेल वाजवण्या पूर्वीच घर माझ्याशी बोलू लागते. घरा संबंधी नंतर केंव्हा तरी लिहीन. सध्या तरी मी दारातच उभी आहे. पोस्ट देताना वाचकांचा अंदाज घेते, कारण ब्लॉग रुपी घरात मी अजूनही रुळायची आहे.