खांद्यावरचे घर……………

अहाहा! अजबच! केव्हढे हे सामान. उगाच काढले बाई हे काम. बर झाल दुपारी पाहीले, हे ऑफिस ला आहेत म्हणून बर. वादाचा विषय झाला असता. तसा तो आहेच म्हणा, पण आज संध्याकाळी पार्टी ला जायचे आहे हा प्रकार आवरण्याचा पुन्हा पहिलाच पाहिजे. अडत तर माझ्या वाचून, स्वताचा खिसा तो केव्हाढसा काहीही मावत नाही, रुबाब तो करायचा. आता काहीतरी छोटेसे गिफ्ट घ्यावे तर लागणारच. ह्नं देतील मलाच सांभाळायला. डूकरीणी च्या पोटा सारखे वजन खांद्यावर कशी काय सांभाळतेस देव जाणे! ही आणि तक्रार वजा काळजी. माझा संसार मीच वाहते, पूर्वी कशी पाण्याची कावड असायची, तसेच परिवाराला लागण्याऱ्या सर्व गोष्टी हक्काने माझ्या खांद्या वरच्या घरात असतात.

खांद्यावरचे हे घर अजब परंतु बहुविध कारणांसाठी एकच पर्याय म्हणून कुटुंबाचा एक अविभाज्य घटक बनलेले असते. त्यावर सगळे अवलंबून असतात. घरातील खोडसाळ मंडळी कुत्सित पणे टोमणे ही देतात. मुले तर निवांत पणे खेळण्यासाठी किंवा त्यांचा वेळ जाण्यासाठी त्यांच्या माता, बाळ हातात हे घर खुशाल सोपवतात. हे युनिवर्सल आहे. हे घर गरजे प्रमाणे बदलते, घराचा आकार, त्यातील गोष्टी ह्या त्या व्यक्तींच्या विश्वा भोवतीच फिरत असतात. एकाच खांद्या वर चे हे घर प्रत्येक प्रसंगानुसार सरड्या सारखे आपला चेहरा मोहरा बदलत राहते.

परंतु युग कितीही पुढे गेले तरी ह्या खांद्या वरच्या घराची जवाबदारी काही कमी होत नाही. घरातील स्त्री ह्या सर्व समावेषक घराला नेहमी भरपेट ठेवते तिचा पती सुद्धा ह्या घरातील सामान चटकन शोधू शकत नाही. स्वताचा खिसा सुद्धा त्याला छोटा वाटतो. तिच्या घरासाठी त्याच्या पण वस्तू तिला सांभाळण्यासाठी देतो. हो! हे ‘वॉकिंग – टोकिंग’ घर म्हणजे खांद्यावरची पर्स होय. अनेकविध पर्स गोळा करण्याचा स्त्रियांचा जन्मतःच स्वभाव. त्यावरून त्यांच्या आवडी निवडी, व्यक्तिमत्व काय धाटणीचे आहे. हे हि निरीक्षण करण्याचा माझा स्वभाव आहे. बटवा……….ते पर्स असा भारतीय पोशाख लाभला आहे, तसाच वारसा पण भरजरी पैठणी सारखा आहे.

आजीच्या बटव्यात आणि चन्चीत हमखास आवडीच्या गोष्टी मिळायच्या. सुपारीचा तुकडा, फणी, पोटदूखीवर गोळ्या, लिमलेट गोळ्या, वाती व कापूस, झांझा आणि बरेच काही, सगळे खूप पहावयास मिळावे असे खूप वाटायचे पण आजी वस्ताद ढिम्म कशाला हात लावून द्यायची नाही. ती खूष झाली की हातावर नाणी मिळायची, गेलोच धूम ठोकत आवडीचे घ्यायला. भाऊ गोट्या, पतंग, रीळ, मांजा, भोवरा असले काहीतरी घेत असे. मी मात्र नाणी साठवून ठेवायची मग शाळे बाहेरचा खाऊ चिंचा, विदेशी गुलाबी तूरट चवीची चिंच, आवळे, बोर अहाहा! काय तो बटवा आणि अल्लाउद्दीन एकच वाटायचे.

मग आला जमाना आईचा, शाळेत शिक्षिका छोटासा डबा, पाण्याची बाटली, आणि हो अत्यंत महत्वाची म्हणजे फोल्डिंग ची भाजीची पिशवी, लाल, निळे पेन, पेन्सील आणि चष्मा, छत्री की निघाल्या शाळेत, येताना मात्र पर्स भरलेली उत्तर पत्रिकेचे गठ्ठे, हातात भाजी ची पिशवी हमखास असायची. मी कॉलेज ला जाऊ लागले रेल्वे च्या फिरत्या दुकानातील सर्व वस्तू माझ्या कडे असायच्या. म्हणून म्हटले की काळानुसार, गरजेनुसार बदल स्वाभाविक आहेत तेच स्त्री च्या अस्तित्वाचे निदर्शक आहेत. बटवा……….ते आय. टी. करिअर असा बदल झाला. हे घर कॉमप्याक्ट झाले. घरच काय सर्व जग चीप मध्ये सामावले, व पर्स मध्ये जाऊन बसले.

अचानक लागणाऱ्या वस्तू हाताशी असाव्या म्हणून बरेचसे पर्स मध्ये ठेवले जाते. तिचा सरंजाम पण वेगळा असतो. कन्या असेल तर सौंदर्य प्रसाधने, मुलगा असेल तर वयानुसार गोष्टी बदलतात. आई नीट सांभाळते म्हणून तिला दे, असा वडिलांचा आदेश असतो. दोन तासा करता जरी बाहेर पडले तरी ह्यातील एक तरी वस्तू आईच्या पर्स मध्ये येते. समजा काही अडचण आली तर खाण्या पासून सर्व गोष्टी धकाधकीच्या जीवनात जवळ ठेवाव्या लागतात. त्यात भर म्हणजे आता मास्क ठेवायचे. खर तर मी यादी देणार होते पण काही फोटो देते. वस्तूंचा अंदाज येईल.

पर्स चा आकार सतत काळानुसार, चित्रपट नुसार बदलता राहतो. आशा पारेख नटी च्या काळात उडत्या गाण्याच्या चालींवर बोटांवर फिरवता येणारी पर्स दिसली. आता पुन्हा मोठ्या पर्स ची सुरवात झाली. करीना चा नाजूक खांदा आणी, भली मोठी पर्स! काळजी वाटते, खांद्याच्या हाडाची दुखापत होईल का? कापडी झोळी राजेश खन्नाची, खांद्यावर लटकावली की जगाची काळजी झोळीत घेतली असा अभ्यासू चेहरा आपोआपच होतो. खांद्यापासून मस्तक फारसे लांब नाही. काही मुले, मुली ही शबनम कंबरेच्या इतकी खाली ठेवतात की पायांच्या तालाबरोबर ती पण आपल्या डोळ्यांना अस्वस्थ करते. ह्यांनी आईला पदर खोचून आटोपशीर काम करताना पहिले नाही का? अशी शंका येते. व्यक्तीची वृत्ती मी अशी न्याहळते.

पर्स ला अडकविण्या साठी नव्हे तर रूप अधिक खुलवण्यासाठी विविध गोष्टी मिळतात. तिला पण मेक ओव्हर ची गरज आहे. कुल लुक्स, …….लुक्स असे शब्द तरुणाईचे, एकूण काय काळ बदलतो आपण ही बदलूया. बटव्या चा इतिहास आठवूया आणी पर्स वरून लेख लिहूया ही उर्मी तयार झाली म्हणून पर्स आवरायचे निमित्त तयार करून हा प्रपंच खांद्या वरचा आपणा साठी सांभाळत आणला.

लहान बाळांच्या गुलाबी कॉटन च्या पिशव्या, त्या बाळाचे बाबा मी बाप आहे असा अभिमान बाळगत,सांभाळत राजाच्या तोऱ्यात बायको मागून चालतो ते पाहून पर्स ची कल्पना सुचली. आणी हो ही पोस्ट सर्वांची आहे कारण घरी आई, पत्नी, मुली,बहिण इत्यांदीच्या पर्स बाबत काही आडाखे प्रत्येकाच्या मनात असतातच. पुरुष वाचकानो तुमच्या वोलेट बाबत म्हणजे खिशातल्या पाकिटा बद्धल?