आपल्याकडे बघण्याचा कार्यक्रम करून ठरवलेले लग्न साधारण पणे जवळचा मुहूर्त पाहून लगेच करण्याची मानसिकता असते. माझे ही लग्न, मे मध्ये पसंती झाली व जून चा मुहूर्त पालकांना मिळाला. सासर सांगलीचे, पण मुलाचे घर ठाण्यात माझ्या माहेरच्या गावात. कार्यालय पण ठाणे येथेच घेतले. मुलाच्या घरी माझी पसंती झाल्यानंतर त्यांच्या आई वडिलांनी ठाणे येथील मुक्काम वाढवला. त्यांना मदत करण्याची जवाबदारी मीच अत्यंत हुशारीने स्वतावर घेतली.
शिक्षिका म्हणून मी तयार होतेच, निरीक्षण करणे हा माझा छंदच, त्यातून होणाऱ्या सासूबाई हे एक आकर्षण. मला नाही वाटत, कि लहानपणापासून कुठलीही आई, ‘सासू’ ह्या विषयावर मुलीला काही पढवत असेल, ही कृपा मालिका करतात. आता मी हुशार कशी ते सांगते. प्रेमाचा मार्ग पोटातून जातो हे पाठ झालेय आता. मी ही सासू च्या मुलाकडून ” मेरे मां जैसा खाना, मै भूल नाही सकता” हे संवाद मला ऐकवू नयेत म्हणून भावी पतीच्या पोटाचा मार्ग शोधण्याकरता, मदतीच्या निमिताने मी तिकडच्या घरी जाऊ शकत होते.
अहो! आई’’ हे लग्ना आधी सासूला हक्काने म्हणता येते ( भावी पतीला अहो! चा सन्मान लग्ना नंतर मिळतो) तशाच हाका मारून माझी मस्का पोव्लीसी मी ही केली. त्यांची पाककला पहावी, म्हणजे मुलाला आईच्या खाण्याची आठवण न यावी. माझा दुष्ट हेतू अजिबात नव्हता सासूचा मुलगा सुखी व्हावा ही तळमळ होती हो माझी.
‘नवरा’ म्हणून नवीन जवाबदारी स्वीकारणारा माझा भावी पती त्याच्या गावीही नव्हते मी कुठल्या तळमळीने येते. माझ्या सासूबाई ठाण्यात नव्या, मला मे महिना म्हणून शाळेला सुट्टी होती. जून मध्ये सुट्टी घ्यायची म्हणून नवरा मुलगा मे मध्ये फक्त रविवारी घरी सापडायचा. साहजिकच माझी हजेरी तिकडे शुभप्रभात पासून असायची. प्रेम विवाहात जवाबदारी मुलीची फक्त सासरच्यांना आपलेसे करणे एव्हढे असते, पण आमच्या सारख्यांच्या जवाबदारीत पूर्णपणे सगळेच अनोळखी असते.
माझ्या आई चे वैतागणे व्हायचे घरी राहत नाही म्हणून पण मी अग् ठाण्यातच आहे न म्हणून तिला गप्प बसवत होते. गावातल्या गावात आई कडे जाणे हे काही तासां करताच होईल ह्याची जाणीव सासरी आल्यावर झाली. तरीही मी रविवारी नाश्त्याला तिकडे हजर. तिकडेच नाश्त्याला मला शोध लागला ‘ इडली’ करणे हे रहस्य आहे.
आता इडली काही नवीन प्रकार नाही माझ्या माहेरी इडली हा आवडता प्रकार होता. आई ही रविवारी हमखास इडली करायची. उबदार इडली हिरव्या चटणीत बुडवायची, दुसरा घास सांबारात लोलवायचा व जिभेवर ठेऊन आई कडे पाहून खुशाल हादडायचा अहा हा ! वाफाळलेली कॉफी ! मग वर्तमान पेपर घेऊन लोळत वाचणे! काय सुख आठवले.!! अजूनही माझा भाऊ हा आनंद घेतोय मी मात्र इथे नुसत्याच आठवणींवर राहते. विषयांतर नको…………
असो ही इडली सासरची, माझ्या सासूबाई नी केलेली, मी पती कडे पाहत होते, खूप रमले होते. हंंह फारच आवडती दिसते ह्यांना आई ची ही डिश. माझ्या मनात प्रेमाची बेरीज वजाबाकी सुरु झाली. हे आव्हान स्वीकारायलाच पाहीजे. दुसरा घास मी घेतला आणि आव्हान संपुष्टात आले. इडली पुढे शरणागती पत्करली, मी ही माहेर समजून सासू कडे अत्यंत आदराने पाहू लागले. विरघळत होती ती प्रत्येक घासाबरोबर, मी मुळात माहेरी कधी पदार्थात चमचा पण ढवळला नाही, आई चे फक्त निरीक्षण करायची. पण पदार्थांना मनापासून दाद द्यायची. इतके अगाध ज्ञान मजकडे होते. सुखी होते खाणे ते ही नुसते, करणे नाही. अज्ञानात सुख असते ते हेच वाटत.
पण आता ह्या पुढे माझे व ह्यांचे पोट माझी जवाबदारी होणार. म्हणून मी न धास्तावता हुशारीने शिकणे असे ठरवले होते. गुबगुबीत, स्वच्छ पांढरी, लुसलुशीत मऊ, पण जरा निवली कि स्वताचे अस्तित्व चिटकून न ठेवता सहजपणे आख्खी तळहातावर विराजमान होणारी, अलगद आपल्याकरता प्लेट मध्ये येणारी अशी माहेर सारखीच इडली पण सासर माहेर असा भेदभाव न करता आता मला माझ्या संसाराकरिता करायची.
चार रविवार संपले, व मी सासरी आले. सासूबाई ठाण्यातच होत्या. मी त्यांनी लवकर जाऊ नये म्हणून आग्रह केला होता. रविवार आला सकाळी जरा मी उठण्याची टंगळमंगळ च करते. नाश्त्याला इडली तयार. मी ओशाळले! अहो! आई म्हणत, आता पुढच्या वेळी मी करते. आणि मी केली. नेहमी सारखी झाली आवडली सगळ्यांना पण त्यांच्या सारखी नाही म्हणून मी खट्टू झाले.
आई, मला तुम्ही तांदूळ डाळ प्रमाणापासून दाखवा, सकाळी वाटताना माझ्या बरोबर उभ्या रहा, मी सावध पणा चा बाणा घेतला. माझी धडपड त्यांच्या लक्षात आली असावी कारण तीही सून होतीच न. त्यांनीही दाखवले तरी इडली माझ्या नेहमी सारखी. मग माझ्या मनात संशय येऊ लागला.अजून काहीतरी ह्या मिसळत असणार. मी शोधाशोध केली आणि काही पदार्थ पूरक आहेत असे कळले इडली ची तब्येत गुबगुबीत होण्यासाठी, पोहे, शिजवलेला भात, मेथी दाणे, इत्यादी अनेक गोष्टी कळल्या, गरज शोधांची जननी असते.
मी घरातील हे सर्व पदार्थ संपले आहेत ह्याची खात्री करून सूनवास करून आई उद्या इडली च करा न असा लडिवाळ हट्ट केला. माझ्या आई चे व त्यांचे फोन वर बोलणे व्हायचे दोघीही हसत असायच्या. मला माझ्या आई चा पण राग आयचा सासूबाई न सामील असायची. मग माझी जिद्द अजून वाढायची. पूरक पदार्थ कुठे आहेत हे सुद्धा त्यांनी विचारले नाही तरी सकाळी इडली संसार सुख मानव्ल्यासारखी टम्म फुगलेली.
मग मी हि ओशाळले. आईने हे संस्कार केले नाहीत. खरे सांगण्यासाठी धीर एकटवला.त्या हसून म्हणाल्या, ‘ अग् तू पण छान करतेस.माझ्या सारख्या पण जमतील’ काही दिवसांनी सासूबाई सांगलीला परत गेल्या. मी मात्र पूरक पदार्थांचा वापर करत प्रयोग सुरूच ठेवले. काय करणार पती परमेश्वर? ( देव म्हटले कि आपण चुका करायला मोकळे किती छान सोय आहे). नवरा पक्का खवय्या तसाच एक पोळी सोडली तर उत्तम सर्व पदार्थ करणारा, तेही कुठलाही पसारा न करता. त्यामुळे माझी पंचाईत होते.मी एकलव्य सारखी पाककला अभ्यास सुरु ठेवला. मध्ये मध्ये पाककला क्लासेस ( माझे पाककला वर्गे माहेरी भाऊ व इकडे हे ह्यांचा मला गप्प बसवण्याचे हुकमी साधन आहे) चा आधार घेत होते.
माझा लेक अजिंक्य तान्हे पणी भात चुरून खाऊ लागला तेंव्हा मी इडली ची ओळख करून देण्याचे ठरविले. ताटलीत इडली आणली. ‘चांदोमामा’ म्हणत त्याने आश्चर्याने आ केला. तो राम मी कौसल्या झाले. घास भरविला.त्याचा टेडी जवळ ओढला ”मम मम मऊ मऊ” म्हणत खाऊ गट्टम केला. आणि मी जिंकले. आईंचे बोलणे खरे झाले. माझ्या इडली चे रहस्य बाळाच्या डोळ्यात चमकताना दिसले. लेक वडिलांचे गुण तंतोतंत घेऊन जन्माला ला त्यामुळे हा हि खवय्या पसंत पडले तर लगेच प्रतिक्रिया देतो. जसे पोस्ट च्या लिखाणावरून आपण दाद देतो.
आईला व आईना फोन करून लगेच नातवंडाचे कोतूक कळवले. सासू होण्याआधी ती आई होती, हे उलगडायला मला मी आई झाले तेंव्हा कळले. आई तू हॉटेल का काढत नाहीस? इथपर्यंत सुखावत माझे अन्नपूर्णत्व कौशल्य झाले. आता तरी एकदाचे ज्याच्या साठी केला अट्टाहास …………..म्हणून सुस्कारा देणार तोच नवीन आव्हान दिवाळीत येते, ते म्हणजे माझ्या आईचे बेसनाचे लाडू. आज्जीच्या लाडू ची आठवण झाली असे म्हणून लेक पुन्हा मला बाणावरचे पितामह आठवून देतो.
‘तहान लाडू व भूक लाडू’ करून ठेवणाऱ्या आज्ज्या त्यांची सर आम्हास कशी येणार? लेक जस जसा मोठा होत गेला तश्या आवडी पण बदलल्या. मी पालक पनीर करताना दोन्ही आज्ज्या माझ्या बाजूला उभ्या राहून बघतात.माझ्या आई सारखे करा असा नातवंडाचा आग्रह असतो. ह्या झाशीच्या राण्या पदर खोचून तयारच असतात. पण मुद्द्याचे काय की, आता माझ्या पण पदार्थांना महत्व आले. आज्जी पुन्हा नव्याने आई होण्यास सुरवात झाली. तेही त्यांच्या साई च्या मायेकारिता.
आता माझ्या ह्या पोस्ट चा पुढचा भाग मी लिहीन जेंव्हा
पालकपनीर………….सुनबाई………आणी……मी असे होईल तेंव्हा. सध्या तरी ऐव्हढेच.