भेटवस्तू

दीपावली झाली म्हणून हुशः करून बसले. दीपावली करिता म्हणून काढलेले रांगोळीचे डबे, लायटिंग च्या माळा, पणत्या…..एक न दोन अशा सर्व गोष्टी पुढील वर्षापर्यंत नीट राहाव्या म्हणून कपाटात ठेवण्याकरिता कपाटाचे दार उघडले, अरे ! हे काय कपाट भरलेले.आपणच भरतो, आणि पुन्हा अगम्य असे रहस्य वाटून कपाटासमोर स्थितप्रज्ञ होतो. मी ही असच केले होते, आलीया भोगासी……असा दीर्घ श्वास घेत आता आवरायला पाहिजे अशी जाणीव प्रकर्षाने होऊ लागली, आणि कपाटात जागा निर्माण करण्यासाठी, घरभर माझी पळापळी सुरु झाली. घरातल्या शोकेस ने तोंड वेंगाडले, मुलांच्या कपाटाने अंग झटकले. पोटमाळ्याने पण मला झिडकारले. ह्यांचे कपाट तर माझ्या पर्स मधल्या सामानासारखे अस्ताव्यस्त असते. खिन्न झाले.काय करावे ? कसे आवरावे ? सुचेना काही.

माझ्या कपाटा समोर योध्या सारखी सामोरी गेले. एक भली मोठ्ठी पिशवी, रंगीबेरंगी दिसली म्हणून उघडून पहिली, तर दीपावलीच्या भेटवस्तू होत्या. त्यांचे आकर्षक वेष्टन सुद्धा दूर करू शकले नव्हते. मुकेपणाने.अडगळीत पडल्या सारख्या केविलवाण्या भासल्या. कधीही न लागणाऱ्या,गरज नसलेल्या,भारी किमतीच्या,बेताच्या दर्जाच्या टिकाऊ ,टाकाऊ भेटी होत्या आपल्या मालकांचा दर्जा दर्शविणाऱ्या, भावनांपेक्षा, औपचरिकता अधिक होती.माझे घर ‘ जगत मित्र ‘ प्रमाणे तुपातल्या पिठीसाखरे सारखे सण आले कि, पाहुणे, आप्त, स्नेही, कार्यालीन ओळखीचे ह्यांचात रमते. माणसांची ओढ त्यांच्या भेटवस्तू मुळे अशी अंगावर येते.काहीही आणू नका असे निक्षून सांगितले तरि,हातात ठेवले जाते.पुन्हा त्यांच्या कडे जाताना त्यांच्या भेटवस्तू च्या किमतीचा विचार करून रिटर्न गिफ्ट देणे भाग पडते. अभिमन्यू चे चक्र आठवते.

कपाटाचे खूप झाले कि काय मला फ्रीज आठवला, धावले तिकडे ह्यावेळी मिठाई व चौकलेट यांनी गर्दी केली होती, सुकामेवा महाग झाल्याने हा पर्याय ! फ्रीज च्या बाहेर ठेवणे शक्य नाही. कसे निस्तरायचे सगळे , विचारांचे चक्र गरागरा फिरत होते.

उचलून देऊ का कोणाला? कामवाली, सोसायटीचा राखणदार, दुधवाला, पोस्टमन सगळे दीपावलीचे पैसे मागतात, तुमच्या वस्तू घेऊन ठेऊ कुठे विचारतात. खरे आहे. ह्या भेटवस्तूंच्या व्यापात फराळाचे ताट आठवले, प्रत्येका कडून प्रेमाने ताट यायचे, कौतुक, जिव्हाळा जाणवायचा,कितीही खाल्ले तरि कंटाळा नाही यायचा, कॅलरीज चा विचार स्पर्श पण करत नव्हता.नात्यांना उब मिळायची. हं गेले ते दिवस ! हे तर दिवाळीचे, पण गणपती म्हणजे मोदकांचे ढीग, फळांची रास, नका हो ठेऊ तर भावनांचा प्रश्न ? एक मस्तक, दोन हस्त, चांगले मन पुरेसे नाही का सणांना ? घर सोडून बाहेर जाता ही येत नाही कारण घरी सण असतो मग हे वेळच्या वेळी संस्थाना पाठवणार तरी कसे ? शोकेस च्या वस्तूं चा आश्रमांना काय उपयोग ? घरचे एवढे सारे तर सार्वजनिक ठिकाणी ? कोण आवर घालणार ? भावनांच्या मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार?
लग्न समारंभात ‘ कृपया, आहेर आणू नका, पुष्प पण नको,आपली उपस्थिती हाच आमचा आनंद ‘ असे आमंत्रण मिळते. अशीच शुभेच्छा पत्रे आमंत्रणाची सणांना मिळतात का? आपणच तयार करावी हे बरे होईल.फटाके करिता जनजागृती होतीय, मग भेटवस्तू करिता काहीतरी असेलच……. की नाही. सुरवात आपण करावी,थोड्या फार फरकाने ह्या परिस्थितीत सगळे कधी ना कधीतरी असतोच. विचारांचे चक्र, मनात आंदोलन देते झाले.

भेटवस्तू सणाच्या देणे,घेणे चालू ठेवायचे तरी किती,
हे सारे थांबावे ,पैशांचा अपयव्य टाळण्यासाठी,
घरापासून सुरवात आपण करणार तरी कधी ?

भेटवस्तू ह्या प्रेमाच्या,जिव्हाळ्याच्या निदर्शक असतात. चांगल्या संकल्पनेचा अतिरेक होऊ नये. पुस्तके,कुटुंबाकरिता खरेदी कुपने, ग्रंथालयाची फी, प्रवासाचे प्रवासी चेक, आरोग्य तपासणी फी अशा अनेक माध्यमातून आपण भेटवस्तू देऊ शकतो. फक्त परिवर्तनाची तयारी दाखवली पाहिजे.