ओबामाच्या ओठांची जखम…..आणि पौगंड संवाद.

पौगंडावस्था हे नाव पण कस जीभ वळवून म्हणावे लागते. कुठलीही गोष्ट हि ह्या वयात खूप कळत असते असा अविर्भाव असतो. मोठ्या माणसा सारखे वागायचे असते पण वयाचा अल्प अनुभव भन्नाट विचारांची मंथने घडवत असतो. विचारांना योग्य दिशा हि नाही मिळाली तर भरकटण्याची शक्यता असते. ह्या वयाची मुले/मुली जास्तीतजास्त वेळ समवयस्क मंडळी बरोबर असतात त्यामुळे पालकांशी संवाद करण्याच्या वेळा कमी होतात. परदेशात मात्र हि मुले पालकांसमवेत जास्तीत जास्त असतात. त्यामुळे पालकांची जवाबदारी खूप वाढते. पालकांना पण खूप स्पष्ट आणि मैत्री पूर्ण राहावे लागते. अशाच वयातील हे काही संवाद….

—आई आणि तो
— अरे जरा मी बातम्या पाहते बर का? आज न ओबामाच्या ओठाला जखम झाली आणि बारा टाके पडले.
तो—- अग, आता ओबामा पप्पी कशी घेणार?
—-उडालेच!!!!
तो—–अमेरिकेच्या विमानतळवर पोहोचल्या बरोबर त्यांनी मिशेल ची पप्पी घेतली होती न.
—-हं!! ठीक आहे. लहान आहेस का पप्पी म्हणायला? पप्पी आई ची असते.
तो—–तेच म्हणतोय न, पप्पी कशी एक मिनिटात संपते, तशी होती.
—–अरे त्यांच्या कडे आनंद असाच व्यक्त करतात.
तो—–लांबलचक घेतात त्याला किसिंग म्हणतात. मी काय बोलयला चुकलो? उगाच बोलतेस हल्ली.
—-ठीक आहे. आज प्रोजेक्ट कुठला दिला तो करत बस.
तो——आज एड्स वर प्रोजेक्ट दिला. आता वांदे झालेत. —–नेट वर माहिती असते, त्यातील घे.
तो—– आई, ते न होण्याचे उपाय पण लिहायचे आहेत. नेट वरच्या साईट पाहत बसलो तर तू चीडशील. तूच सांग कसा पूर्ण करू?
—–बर बर मी बघते आधी, मग तुला सांगते,
तो—–मी काही उपाय आता सुट्टीत पुण्यात रस्त्यावर पडलेले पाहिलेत. तसंच लिहायचे का?
—–एव्हढे काही लिहायची गरज नाही. मुलांना ह्या आजाराबद्धल माहिती असावी बस.
तो—आई, फ्यामिली प्लानिंग करता पण ह्याच कॉमन अक्सेसरीज आहेत.
——ह्याचा काय संबंध?
तो—-अग. प्रोजेक्ट चार पाने हवा म्हणून पॉईन्ट वाढवतोय.
तो—- आई आम्ही आज वर्गात खूप हसलो, टीचर पण हसल्या.
—– काय झाले एव्हढे!!
तो— टीचर पर्स मध्ये आमचे पेपर ठेवायला विसरली, खूप वेळ शोधत होती, आणि म्हणाली—-मी रात्री प्रीकोशन घायला हवी होती. सॉलिड न मग काय वर्गात एकच हसाहसी झाली. आम्हाला वाटल प्रोजेक्ट तसा विचित्र आहे पण टीचर नि खूप हसवले.
—–झाल असेल विसरल्या असतील खरच. आपण प्रोजेक्ट बद्धल बोलूया का? काय काय मुद्दे तुम्हाला लिहायचे ते शाळेत सांगितले नाहीत का?
तो —उद्या सांगणार आहेत. तो पर्यंत आम्हीच विचार करायचा आहे.
—–ठीक आहे. आपण चांगल्या शब्दात लिहूया. मी माझ्या शाळेत पण हा विषय विद्यार्थ्यान बरोबर चर्चा करत असे. मी सांगते तुलाही समजावून मग लिही.
तो —-आज फेस बुक वर धम्माल येणार, आमचा प्रोजेक्ट.आणि ओबामा, सॉलिड वांदे झालेत त्याचे.
सगळे कसे सुटतील बघ.
आई, डोन्ट वरी मी बघतो. तुमच्या सारखे आता राहिले नाही. बाबा गावावरून आले कि, तू त्यांची दारात दृष्ट काढतेस. मी म्हणत नाही कि मी ओबमा सारखे करीन पण जरा तरी बदल न ग.
——-चल रे टोणग्या पळ आता.
विषय खरच सामाजिक जाणीवेचा होता पण ह्या वयातील मुलांना कळणे हि गरजेचे असते. सध्या टीव्ही माध्यमाने मोठे आणि छोटे वय ह्यांच्यातील अंतर फार कमी केले आहे.

दुसरा संवाद—

तो आणि बाबा. निवांत गप्पा करत होते.

तो—-बाबा, तू होस्टेल ला शिकलास न. तेंव्हा तु मुलीला प्रपोज केले होते कारे?
——आमचे होस्टेल फक्त मुलांचे होते आणि इंजिनिअर शिकायला कमी मुली असायच्या त्या सुद्धा अभ्यासू.
तो——तुला कोणीच भेटले नाही???
( लेकाच्या चेहऱ्यावर भला मोठा प्रश्न, आणि बाबांचे डोळे आईकडे रोखले होते.)
—–तसं काही नाही होत्या तशा दोन चार बऱ्या पण अरे अभ्यास एव्हढा होता कि वेळच मिळत नसे.( बाबांची सारवासारव)
तो—-मग काय बाकी काही विचारायला नकोच.
——अरे विचार दुसरे काही. मी पण आई सारखे सगळ छान सांगू शकतो.
तो——तसं नाही रे. पहिला प्यार, तो पहिलाच असतो. तूला काय प्यार चा काहीच अनुभव नाही.
——-प्यार काय लग्न ठरल्या नंतर पण होते. मला तुझी आई आवडली म्हणूनच मी तिच्याशी लग्न केले न.
तो—–तुझ काय अरेंज लग्न होत. मी पाहतो न, तू खूप वेळेला नेट वर असतोस ऑफिस चे काम करत, आणि आई शेजारी बसून पुस्तक वाचत असते. लाईफ असे बोअरिंग करू नका रे.
——बच्चमजी, म्हणत बाबांनी लेकाचे गाल ओढले आणि म्हणाले.—–लाईफ नुसतेच प्यार प्यार नसते… काम पण करावे लागते.

तिसरा संवाद—

तो आणि त्याचा मित्र.

तो—– अरे यार बातम्या बघतोय. आपण इथे परदेशात पण तिकडे भारतात अजून कसाब ला फाशी नाही. वाटत जाव आणि धाडधाड गोळ्या घाल्याव्यात.
——-मला तर ह्या सगळ्या पॉलीटीशन न घरी पाठवावेसे वाटते. इतके वर्ष नुसते पोलिटीक्स शिकतो पण हे बदलत नाही.
तो—–मनसे चा राज काय भारी दिसतो रे! मला तर आवडतो. तुला कोण आवडत?
——- तोच बरा आहे रे, स्मार्ट आहे. कुठे काही जमवलाय का रे त्यांनी? माहिती आहे का तुला?
तो—–कल्पना नाही पण सीधासाधा वाटतो. अजून त्यांनी त्यांच्या पार्टीत सॉलिड हिरोईन घेतली नाही मग बघ कसा बकरा होतो.

असेच भरभरून बोलतात. प्रेम विषय असो नाहीतर राजकारण, घरातील नाते संबंध ह्यावर पण त्यांची मते तयार होत असतात. हेरी पोटर पासून ते प्रत्येक विषयात ते समरस होतात. जागरूक राहण्याची सवय पालकांना करून घेण्यास हवी. ओबमा ते गांधीगिरी हे विषय पण समान पातळीवर बोलले जातात कारण अपरिपक्व मनाची बांधणी होत असते. कधी मजेशीर तर कधी अंतर्मुख करण्यास हि मुले पालकांना भाग पाडतात. समाजाभिमुख एकटे जाण्यासाठी भक्कम आधार तर, कधी मित्रत्वाचा हात आणि सगळ्यात महत्वाचे पालकांचा मायेचा स्पर्श आपली पुढील पिढी हि जागरूक, समजदार करेल

छोट्याशा पोस्ट मधून पौगंडावस्था उलगडून सांगणे अवघड आहे. हा छोटासा प्रयत्न पण सुजाण पालकांना निश्चित आवडेल.

ढ……ढ……..ढगांचा

बाराखडीच्या ओळीत येणारा ‘ ढ’…… हा वर्गातील ‘ढ’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुलाचा पण असतो हे कळण्याचे ते बोबडे वय नसते. आईने दाखवलेला ढ……..म्हणजे ढगाचा. आकाशात खूप दूर असणाऱ्या ढगाचा. आई, इतक्या दूरचे दाखवते कि, बाळाचा ढगा कडे बघताना ‘आ’ होतो आणि हातातला घास भरवला जातो. ‘ढ’ शब्द तसा लिहिण्यास सोप्पा आणि जेंव्हा चित्रकला सुरवात होते तेंव्हा तर ढगाचे चित्र ढगा सारखा कापूस बोळा घेऊन कागदावर धबाधब ढग काढणे सुरु होते. मग हात कालांतराने स्थिर होतो आणि आडव्या रेषेवरचे गोल गोल काढलेले ढग पानभर हसू लागतात. त्यांनाच चेहरे काढण्याचे शिकवले जाते आणि खेळ सुरु होतो ढगातून आकार शोधून काढण्याचा हा एक उद्योगच होतो.

ढग कसा निर्माण होतो हे शाळेत हळू हळू कळते. प्रत्येक आवडीला स्वःताचे एक वय असते. कुठल्या तरी वयात ढग बघण्याचे वेड लागते. नकळत गच्चीत, ग्यालरीत जाणे झाले तरी आकाशाकडे एक नजर टाकली जाते. अचानक भावंडाची हाकारी सुरु होते, लवकर या आणि बघा काय अफलातून आकार तयार झाला आहे. कधी ससा, तर कधी राक्षस, पऱ्या, पक्षी अशी विविध मनोरूपे ढगात दिसू लागतात.

बालपणीच्या राज्यात ढगात परी असते, देवबाप्पा तर ढगात असतो. चांदोमामा आणि ढग यांचा पाठशिवणीचा खेळ तर भल्या भल्या लोकांना सुद्धा मोहवितो. कधी एखादी सुरेल तान चंद्राचे ढगातून डोकावणे प्रेम व्यक्त करते तर, कधी तान्हुल्याला आनंदित करते. ‘कभी तनहाहियो मे हमारी याद आयेगी’…असे ढगातून नटी पृथ्वीकडे पाहते तेंव्हा ढग पण व्याकूळ दिसतो.

ढगाचा खेळ हा मनाच्या अनेक प्रक्रियांचा आलेख आहे. एखाद्याला एखादा आकार दिसला तर तोच शेजारी असलेल्याला दिसेल याची खात्री नाही. कधी ढग उडणारा पक्षी वाटतो तर तोच ढग क्षणात अक्राळविक्राळ रूप धारण करतो. या मध्ये सुद्धा पांढरा ढग हा छान आकार दाखवतो तर काळा ढग हा चंद्राला गोरे करतो आणि सूर्याला झाकून टाकतो. मन पण असेच काळे गोरे होते. संध्याकाळचे ढग तर सूर्यास्ताची मजा काही और करतात.

ह्या ढगांची तुलना आपण आपल्याबरोबर केली. ढगात गेला…..ढगासारखा दिसतोयस……..ढगात नेतो काय?…….ढगात जाऊन बैस…… ढगात तरंगू नकोस ह्नं…….ढगोब्बा आणि अग्गबाई!!!! ढग्गुबाई!!!!…….. ढगात वार करू नकोस…. ढगासारखे कपडे का आहेत….पोटात ढगासारखे गुडगुडते…. असे आणखी बरेच काही. मित्रांच्या यादीत एखादा तरी ‘ढग्या’ असतोच. तर मैत्रीणीत एक तरी अगदी ‘ढग्गुबाई’ असतेच. मोठ्यांची मजा मोठ्यांना आणि लहानपणाला मात्र ढग्गुबाई चे गीत ताल धरायला लावते. आहे? कि नाही? ह्या ढगांचे आणि आपले नाते.

काही दिवसापूर्वी मी भारतातून मस्कत ला परत आले. दरवर्षी पावसाळ्यात जाणे आणि येणे त्या मुळे ढगांच्या वरून विमान गेलेले कळत नाही पण ह्या वेळी मात्र मी विमानाच्या खिडकीतून खाली असलेले ढग मनसोक्त पहिले. ढगांच्या दुलईत उतरून गुढगाभर पाय रोवून चालावेसे वाटले. खाली डोकावून मला ढग दाखवणारी माझ्या घराची ग्यालरी शोधावी असे काहीसे झाले होते. जमिनीवर पावसाळी वातावरणात ढगातून खाली येणारे इंद्रधनुष्य मला ढगात आई कडे नेणारा जिना वाटतो.

मनाची पण गम्मत ढगासारखी आहे, कधी गोरी परीसारखी तर कधी काळ्याकुट्ट ढगांसारखी. हेच काळे ढग पाहून मात्र मोर आणि बळीराजा सुखावतो. कोणाला हे ढग दिलासा देत असतात तर कोणाला वादळाची भीती घालतात. ढगांचे हे गूढ पण रम्य नाते भारतातच पाहण्यास मिळते. वाळवंटात रात्री ढग हे कोरडे वाटतात आणि दिवसा उन्हामुळे हे दिसेनासे होतात.समुद्र किनाऱ्यावरून, किल्ल्यावरून आणि शेतातून शेतकऱ्याने ढग धुंडाळणे हे जावे त्या ढगांच्या गावा तेंव्हाच कळते.

ढगा मधला चंद्र ईद ला व्याकूळ करतो तर ढग दूर झालेला आणि दिसलेला चंद्र हा पती दर्शनाचे पुण्य विवाहितेला देतो. धार्मिक बाबतीत पण मौल्यवान असणाऱ्या चंद्राला ढगाला दूर होण्याची विनंती तर करावी लागत नसेल. असा हा ढग आयुष्याच्या कुठल्या तरी आकाशात दिसत असतो. ढग जेंव्हा विहार करतात तेंव्हा ते रिकाम्या पोटी असतील तर मनोरम्य वाटतात. मात्र काळ्याकुट्ट ढगांचे पाणी ओतप्रत भरून एकमेकांवर आपटणे हे विजेची ललकारी देते. कधी कधी हाच ढग फुटून हाःहाकार करतो. अनेकांचे प्राण घेतो, होत्याचे नव्हते करतो.

ढगांचे प्रकार भूगोलात शिकण्यास मिळतात. ढगांचे वर्गीकरण वातावरणाच्या टप्प्यानुसार केले जाते. शास्त्र विषयात सुद्धा फार मोठा व्यापक अभ्यास ढगांचा आहे. ढगांचा अभ्यास हा प्रकाश, हवा आणि तापमान ह्या घटकांशी जोडलेला आहे. प्रत्येकाचा मराठी शब्द नीटसा आठवत नाही म्हणून इंग्लिश मधील ढगांचे वर्गीकरण कल्पना यावी म्हणून देत आहे.

ढग न्याहाळणे हे प्रत्येकाने अनुभवलेले असतेच आणि हाच अनुभव आपल्याला मनातील विचारांचे ढग दूर करण्यास किंवा विचारांच्या ढगात नेमकेपणा बघण्यास शिकवतात.

ढगांचे आणि आपले नाते उलगडून दाखवण्यासाठी हे ढगू विचारांची हि पोस्ट आता मात्र ढगासारखी पसरू लागली आहे. तेंव्हा ढगांचा हा विहार येथेच थांबवते.

किल्ल्यांची दीपावली …… सकाळ समूहाची स्पर्धा किल्ल्यांची

सहा वर्षांनी भारतात दीपावलीला असण्याचा योग जुळून आला. अजिंक्यने लहानपणी पाहिलेली दिवाळी विसरून गेला होता. पुण्यात राहणे म्हणजे किल्ले स्पर्धा पाहणे हे निश्चित केले होते. सोसायटीच्या अंगणात एक कोपरा कायम किल्ल्या करता राखून ठेवलेला असायचा. प्रथम किल्ला कुठला करायचा हे ठरवले जायचे. आमचं काळी काही नेट नव्हते ना झेरॉक्स चे मशीन होते. किल्ल्याचे चित्र इतिहासाच्या पुस्तकातून शोधून काढायचो. मग त्या नुसार दगडांची निवड, दगड दुसऱ्या ठिकाणाहून चोरून आणायचे, मग माती गोळा करून किल्ल्यावरची चित्रे गोळा करायचो.

ज्याच्या कडे शिवाजी असायचा त्याला काही काम नाही बाकीचे सर्व मावळे हा समजूतदार पणा मनात चिडचिड करत जपून ठेवायचे. मातीवर पेरण्यासाठी अळीव दुकानातून आणले जायचे. हात, पाय कसे मातीमुद्द होत असत. घरातील मोठ्यांकडून किल्ल्याचे परीक्षण केले जायचे. विहीर आणि शेत हा अविभाज्ज घटक त्या मध्ये असत. हि विहीर कोणी कशी केली आहे हे पाहण्यासाठी रात्री दुसऱ्या वाडीत किंवा सोसायटीत हळूच चोरून जात असू आणि आपली कशी अधिक चांगली करता येईल यावर फार मोठी खलबते होत.

विहिरी करता एक प्लास्टिक डबा प्रत्येकजण घरातून आणायचा त्यातील सर्वानुमते निवडून मातीत खड्डा करून डबा त्यात ठेवून पाणी भरले जायचे. सुई दोऱ्याच्या रिकाम्या रिळाचा उपयोग रहाट करण्यासाठी केला जात असे. प्रत्येक गोष्ट घरातून आणली जायची आणि त्याचा कल्पकतेने विचार करून किल्ला सजवला जायचा. हुबेहूब परिसर करण्यात जो तो मेहनत करत असे. तेंव्हा किल्ल्यांची कुठलीही स्पर्धा वैगरे नसायची. आम्ही सर्व जण एकमेकांचे किल्ले बघायला जात असू आणि मोकळेपणाने दुसऱ्या किल्ल्याचे कौतुक पण केले जायचे.किल्ल्यावरची भुयारे, चोर दरवाजे, शत्रू करता केलेले खंदक, किल्ल्यावर जंगलात असणारे प्राणी… यात वाघ, सिंह यांना वरचढ मान असे. हळूच डोकावणारे ससे… किती किती रचना ह्या शिवाजीमय बनवायच्या. चार फुटात महाराजांचा किल्ला बनवण्यासाठी सोसायटीतले चाळीस जण मावळे पण दमत असू. संध्याकाळ झाली कि उद्याच्या कामाचे वाटप ठरवत असू. झोप कधी लागायची पत्ताच लागायचा नाही.

किल्ला नंतर फटाके त्या मध्ये ठेवून उडविला जात असे मला हि कल्पना फार दुखःदायक असायची.पण सोसायटीतील टारगट मुले काही केल्या ऐकायची नाहीत. मग आई मला घरात ओढून नेत असे. तो दिवस किल्ला का मोडला??? म्हणून रडण्यात घालवला जायचा. पुढच्या वर्षी आपण आपल्या घराच्या ग्यालरीत किल्ला करू मग तू तो कायम ठेव असे वचन मला बाबा द्यायचे पण त्यात मज्जा ती काय?? सोबतच्या सर्वांसहित किल्ला करणे हेच तर खरे अप्रूप आणि सोहळा असायचा.

किल्ले म्हणजे दीपावली हे दृढ समीकरण होते. किल्ल्यांचा आणि दीपावलीचा काय सहसंबध असा प्रश्न मला अजिंक्य ने विचारला. ह्या गोष्टीचा कधी विचारच केला नाही. आम्ही लहानपणापसून करायचो म्हणून तुला पण हे समजावे ह्या करता आपण किल्ल्यांची स्पर्धा पाहायला जाऊया असे बळेबळे तयार केले.

किल्ल्यांचे सादरीकरण हे मुळी एक प्रोजेक्ट होते. त्याची मोजमापे, त्यावरची हुबेहूब रचना दरवर्षी आम्ही हातानी केली त्यामुळे आम्हाला इतिहासाचा कंटाळा येत नाही आणि अजूनही जसेच्या तसे आठवते. आम्ही शिवाजी राजे आणि मावळे वर्षानुवर्षे कागदात फक्त पुढच्या वर्षीच्या किल्ल्या करता जपले नाहीत तर आम्ही प्रत्यक्ष किल्ले जगलो. असे लंबे चौडे भाषण मी अजिंक्य ला सुनावले. शेवटी नको नको करत आमची जोडी किल्ले स्पर्धा बघण्यास गेली.


पुणे आणि किल्ले यांचे समीकरण आहेच त्यात हि स्पर्धा सकाळ समूहाने ठेवली होती. पालकांचा पण क्रियाशील सहभाग असायला परवानगी होती. नवीन मराठी शाळेत हि स्पर्धा होती. शाळेच्या दरवाजावरच छान असा शिवकालीन दिंडी दरवाजा केला होता. ढाल, तलवार यांच्या द्योताकासाहित भव्य अशी भवानी माता पाहून मन कधीच शिवरायान पाशी पोहचले. अजिंक्य हि ते वातावरण पाहून रमला होता. मला सार्थकी वाटले.

पुढे छान अशा मेण्यात शिवाजी राजे बैठक करून बसले होते. पारावर मेणा होता. त्यापाशी आई वर्ग ठिय्या ठोकून बसला होता, आम्ही विनंती केली, आम्हाला फोटो काढायचे आहेत जरा उठता पण आमचे म्हणणे त्यांच्या कानावर पडले नाहीच शेवटी तसेच फोटो काढले. मी अजिंक्यच्या चेहऱ्याकडे पाहण्याचे टाळले. पण त्याने विचारले, आई ह्यांना रिस्पेक्ट देता येत नाही का?? माझ्या मागे परदेशी नागरिक होते, मी मागे वळून पहिले तर ते त्रस्त चेहऱ्यानी पुढे निघून गेले.

मैदानात सहभागी किल्ल्यांचा लक्षणीय आकड्यात प्रतिसाद होता. जणू काही शिवरायांचे किल्ले अंगण लुटुपुटूची लढाई, मोहिमा पार पडण्यास सज्ज झाले असावे. रायगड, राजगड, जंजिरा….. अनेक किल्ले आपापली जागा लक्ष वेधून घेत होते. कोणाचा खापरी लाल रंग, कोणाचा कडक शिष्तीचा करडा रंग, तर काळाकभिन्न रंग कणखर महाराष्ट्राचे वैभव लेऊन खाणाखुणा जपत होता. गडावर बाजारात मिळणारे मातीचे मावळे आणि आजूबाजूची गावठाणे खूपच छान वाटत होती. छोट्या छोट्या किल्लेदारांची उपस्थिती दुसऱ्या दिवशी नव्हती त्यामुळे मालक किल्लेदारविणा परिसर सुना सुना वाटत होता.

किल्ले बनण्यासाठी प्रसिद्ध इतिहास संशोधकांचे मार्गदर्शन मुलांना दिले गेले होते. कल्पना खरच चांगली होती पण दोन दिवसांनी त्या किल्ल्याच्या रचनेला तडे जातात, त्यावर परिसराचा कचरा पडतो. प्रदर्शनाच्या वेळी तेथील मुलांचे समालोचन असावयास हवे, आम्ही आळीपाळीने वेळा वाटून आमच्या किल्ल्याचे संरक्षण करत असू. पानिपतची लढाई त्याचा लाईट आणि म्युझिक शो पण ठेवला होता. मग जी स्पर्धा आपण मांडली त्याचे चित्रीकरण दाखवावे. एखादे मूल हे पाहून प्रेरणा निश्चित घेवू शकेल.


सध्याच्या काळात रेडीमेड किल्ले मिळतात. त्यावर मातीचे तयार असलेले मावळे, भाजीवाली, पाण्याला जाणारी स्त्री, विहीर, संत मंडळी, सैनिक सर्व काही तयार मिळते. काहीच माहिती नसण्यापेक्षा हे हि चांगलेच आहे असा जरी सकारात्मक विचार केला तरी, मोठे झाल्यावर एकदा तरी स्वतःच्या हातानी किल्ला मुलां बरोबर बनवायला हवाच. स्वतःच्या हाताने बनवलेले किल्ले जेंव्हा जपले जातील तेंव्हाच खऱ्या किल्ल्यावर गेल्यावर आपण आणि पुढची पिढी पण ऐतिहासिक वारसा निश्चित जपेल.

सकाळ समूहाने किल्ले करणे ह्या संस्कृतीला इतक्या मोठ्या प्रमाणावर पाठींबा आणि स्पर्धा आयोजित करून परंपरा जपली आहे. अशा स्पर्धेच्या काळात मुलांनी जास्ती वेळ तेथे उपस्थित असावयास हवे असे निश्चित पणे सांगितले असणार. मुलांची आणि पालकांची पण जवाबदारी आहेच. आपल्याला जर उत्तेजन दिले जात आहे तर त्याचा सर्वंकष बाजूने विचार सर्वांनी करावयास हवा. प्रयत्न स्तुत्य आहेच गरज आहे अधिक नियोजनाची.

सकाळ समूह दरवर्षी अशा विविध स्पर्धा आयोजित करून सर्वाना सहभागी करून घेतात त्या बद्धल अभिनंदन आणि धन्यवाद कारण आमच्या सारख्या भारता बाहेर दूर गेलेल्यांना आपला समृद्ध वारसा पुढच्या पिढीला दाखवता तरी येतो. हि माहिती मी इथल्या सर्वाना कळावी आणि त्यायोगे किल्ले सर्वांपर्यंत पोहोचावे. काही माफक अपेक्षा ठेवून आणि आपले कौतुक ह्या पोस्ट द्वारे …. शिवरायांपाशी समर्पित.

ओमानचा चाळीसावा राष्ट्रीय दिवस…………

मरहब्बा… आपले स्वागत

पोर्तुगीज राजवटीला कळून चुकले होते कि, भारताच्या मसाल्याच्या व्यापाराकरता ओमान हे एक चांगले बंदर म्हणून उपयोगात येईल. पोर्तुगीज राजवटीच्या अमलाखाली ओमान होते. कालांतराने १६४६ मध्ये ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनीने ओमान च्या संस्कृतीला आणि धर्माला जपले जाईल असे आश्वासन दिले आणि १८ नोहेंबर १६५० मध्ये ओमान स्वतःच्या हक्कासकट स्वतंत्र झाले. सद्य आदरणीय सुलतान ह्यांनी चाळीस वर्षापूर्वी ह्या दिनाची सुरवात केली आणि तेंव्हा राज्य कारभाराला सुरवात केली तेंव्हा पासून राष्ट्रीय दिन साजरा केला जातो. sultan, Qaboos बिन सैद यांचा १९ तारखेला येणारा वाढदिवस म्हणून पण हा दिवस या दुहेरी आनंदा करता राष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे एक सोहळा असतो आणि तो साधारण पणे महिना भर तरी चालतो.

रस्त्यांच्या दुतर्फा फुलांची झुडुपे लावून गालीच्या तयार करतात, रस्त्यावर आकर्षक अशी रोषणाई असते. अत्यंत नयनरम्य असे वातावरण असते. विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. राष्ट्रीय असा फटाक्यांच्या आतषबाजीचा पण आवाज विरहीत असा सोहळा रात्री उशिरा पर्यंत देशाच्या अनेक भागात आयोजित केला जातो. रस्त्याच्या दुतर्फा आणि अनेक ठिकाणी राजाचे म्हणजे सुलतान चे मोठे मोठे फोटो अत्यंत आदराने लावले जातात.

ओमान मध्ये सुलतान हे खूपच लोकप्रिय आहेत. बराचसा कारभार मंत्रीगण पाहतात. ओमान हा एक निसर्ग सौंदर्याने परिपूर्ण, स्वतःची संस्कृती, परंपरा असलेला देश आहे. इतर देशांच्या संकृतीचा आदर केला जातो. ओमान चा झेंडा आणि त्यावरचे रंग यांची आकर्षक अशी उत्पादने येथे मिळतात. पारंपारिक खेळ आणि आधुनिक खेळ यांचा सुरेख कार्यक्रम येथील वैशिष्ट्य आहे. बर्फाचे स्केटिंग येथे उपलब्ध आहे तसेच उंटाच्या शर्यती पण बघण्यासारख्या असतात .

अतिशय शांत, प्रदूषण विरहित आणि नयनरम्य असे ओमान अनेकांचे लाडके ठिकाण पर्यटनासाठी आहे. मस्कत मध्ये १८ नोव्हेंबर नावाचा स्ट्रीट पण आहे. तेल व्यवसाय हा प्रमुख आहे. येथे दुबई सारखी जीवघेणी स्पर्धा नाही. ओमान च्या नागरिकांसाठी येथे नोकरीत आणि व्यवसायासाठी खास आरक्षण आहे त्यामुळे घरचे बेकार अशी परिस्थिती येथे नाही. आज ओमान मध्ये ब्रिटन ची राणी भेट देण्यास येत आहे. ब्रिटन बरोबर ओमान चे व्यावसायिक संबंध आणि मैत्री खूपच सलोख्याची आहे.

येथील करन्सी रियाल आहे. ह्या वर्षी वीस रियाल च्या नोटेचा रंग पूर्वी लाल होता तो निळ्या रंगात बदलला. ओमान ने आपली स्वतःची अशी संस्कृती टिकवली आहेच आणि ती छान जपली पण आहे.

राष्ट्रीय दिनानिमित्त येथे सरकारी सुट्टी दिली जाते. येथे ह्या दिवसाची सुट्टी नंतर पण दिली जाते. गुरवार आणि शुक्रवार ह्या वीकांत च्या सुट्टी ला जोडून हि सुट्टी घेतली जाते. राजाने झेंडा फडकवण्याचे किंवा मिलिटरी ची परेड हि सामन्यांना पाहण्यास मिळत नाही. राष्ट्रीय गीत येथे जाहीरपणे ऐकवले जात नाही. विमान कौशल्य सर्वाना पाहण्यास मिळते ते पण तुम्ही समुद्र किनारी जाऊन बसायचे. प्रत्यक्ष त्या ठिकाणी कोणालाही जाता येत नाही. मिलिटरी चे जाहीर प्रदर्शन येथे नाही.

ओमान चे सर्वच देशांशी सौहार्द्य पूर्ण संबंध आहेत. मुळात अतिशय शांत वृत्ती येथील लोकांचा मूळ गाभा आहे. रस्त्यांच्या दुतर्फा अत्यंत योजना पूर्व दिव्यांच्या माळांचे आणि विविध आकाराचे नयनरम्य सजावट केली जाते. ह्या सजावटी करता प्रत्येक वर्षी एक थीम असते. ह्या वर्षी फुले आणि वाद्ये यांचा सुरेल सुवासिक मेळ विद्युत रोषणाईत दिसून येतो. विद्युत रोषणाई हि मोहक असते डोळ्यांना अजिबात दुखापत पोहचत नाही.

भारताशी तर फार पूर्वी पासून व्यापार उदीम चालत असे. बटाटा, बाबा, तवा, आंबा, असे अनेक शब्द भारत आणि ओमान च्या मैत्री चे द्योतक आहेत कारण इथे बरेचसे शब्द समान आहेत. भारताच्या संस्कृती बद्धल आदर आहे. येथे सर्व धर्मांची प्रार्थना स्थळे, मंदिरे वैगरे आहेत. निसर्गाने परिपूर्ण, शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीय संस्था, शांत, काटेकोर सुरक्षा व्यवस्था, सर्वांच्या धर्माबद्धल आदर , ईत्यादी गुणांनी संपूर्ण असेलेले ओमान हे इथे येणाऱ्या सर्वांचे लाडके होते.

ओमान ने आपला चाळीसावा राष्ट्रीय दिन साजरा केला त्या बद्धल कर्मभूमी असल्याने माझे हि हे थोडेसे योगदान ओमान साठी….. आपल्या सर्वांसाठी.

शुक्रान…..धन्यवाद

घर……पर्यावरणाला साजेसे.

आपले संपूर्ण घर पूर्णपणे एका जागेवरून दुसरीकडे हलवता येते. अर्थात हे घर म्हणजे पोर्टा केबिन ची घरे. भारतात टेलिफोन चा बूथ नेहमी बघण्यात येतात, ऑफिस मध्ये पण पोर्टा केबिन दिसून येतात. परंतु अशी घरे असतात हे ऐकून माहिती होते. प्रत्यक्षात कधी जवळून बघणे किंवा त्यात राहणे असा योग जुळून आलेला नव्हता.

मस्कत मध्ये आल्यावर ट्रक वरून जाणारे हे घरासारखे काय आहे? ह्याची उत्सुकता वाढली. धनंजय नोकरीकरता काही काळ साईट वर होते तेंव्हा अशाच केबिन मध्ये राहत होते. ज्या ठिकाणी ते राहत होते त्या ठिकाणी जाण्याचा योग आला तर हजारो व्यक्ती बरेच महिने वास्तव्य करून राहत होत्या ह्याचा मागसुम नव्हता. कारण आख्खे शहर दुसऱ्या ठिकाणी हलवले गेले होते. जमीन पुन्हा पहिल्या सारखी होती कुठलीही हानी न पोहचता. अशा वसाहती म्हणजे एक परिपूर्ण शहर होते. सुख सुविधा ज्याच्या त्याच्या कामाच्या ग्रेड प्रमाणे त्यांच्या घरात उपलब्ध होत्या. अशी घरे पाहण्याची संधी इथे सहज मिळते.

कालच बातमी पहिली कि. पुण्यात अशा घराचे प्रदर्शन सुरु आहे. तेंव्हा पहिले तर हि तर पोर्टा केबिन ची घरे पण दोन कोन्क्रीट च्या स्ल्याब मध्ये इन्शुलीन म्हणून हार्ड असे थर्माकोल ठेवून ते पूर्णपणे संरक्षित केले होते. अशी घरे वादळात पडत नाहीत कि पुरात डूबत नाहीत.

इथे असेच काहीसे तंत्राद्यान वापरून आग, पाणी,प्रखर उन ह्या पासून पूर्णपणे असे संरक्षित अशी घरे नव्हे तर आख्खे एक शहर उभे असते. मस्कत मध्ये अशा प्रकारच्या वसाहती ज्या ठिकाणी काम सुरु असेल तिथे असतात. दुकाने, दवाखाने, क्लब हाउस, अगदी बाग सुद्धा इथे उभारली जाते. जवळ जाई पर्यंत खरेच वाटत नाही हि घरे कधीही हलवली जाऊ शकतात. सुरेख अशी बांधणी, आकर्षक अशी रंगसंगती आणि अशा घरात आपण दिनदर्शिका सुद्धा भिंतीवर खिळे ठोकून अडकवू शकतो. छोट्या छोट्या सोयीनी ह्या घराला त्याच्या भिंतीना हानी पोहचवू शकत नाही. अगदी छान अशा कोन्क्रीट च्या रस्त्यासकट.. सर्व सोई असतात.

जेंव्हा तिथला प्रोजेक्ट संपतो तेंव्हा हे शहर उचलून दुसरीकडे नेतात. जागा मोकळी होते. कुठलेही नुकसान नाही, खर्च नाही आणि किती आरामदायी घरे असतात. ह्या घरांचा खर्च हि आपल्या साध्या घर पेक्षा निश्चित कमी असतो. कायम स्वरूपी सुद्धा राहण्यासाठी अशी घरे परदेशात नव्हे तर भारतात सुद्धा उपलब्ध आहे. पिढ्यान पिढ्या टिकणारे हे घर असते.

सध्या फार्म हाउस बरीच दिसतात. कधीतरी विकांताला राहणे होते. प्रचंड खर्च करावा लागतो, त्यापेक्षा अशी टुमदार घरे आणली तर जागेवर कुठल्याही ठिकाणी हे घर सहज हलवता येते. जमिनीवर पण कायम स्वरूपी बंदिस्त करता येते. जमिपासून उंच अशा जागी पण ठेवता येते. पर्याय आहेत पर्यावरणाचे, पण अमलात आणण्यास हवेत. बिल्डर लोकांनी ह्या घरांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. अगदी आशियाई वातावरणाला सुद्धा पूरक अशी घरे आहेत.

हि घरे प्लास्टिक चा अनुभव देत नाहीत. अत्तिशय सुंदर रंगात, उत्कृष्ट अशा फरशीच्या रंगसंगतीत हि घरे म्हणजे कोकण च्या कौलारू घरा इतकी छान वाटतात. दरवर्षीचा विकांताच्या घराचा देखभालीचा खर्च खूप प्रमाणात कमी होऊ शकतो. शिवाय हे घर पाहिजे तिथे सहज सोप्प्या पद्धतीने हलवू शकतो. आशियाई वातावरणाच्या बदलांपुढे हि पोर्टा केबिन ची घरे किती टिकाव धरू शकतील हि शंका प्रदर्शनात व्यक्त केली गेली. परंतु पर्यावरणाचा विचार केला तर असे प्रयोग निश्चितच उपयोगी पडतील. अजूनही भारतात अशी घरे सहज दिसत नाहीत. बरेच जण एखादे तरी शेतातले घर असावे ह्या साठी प्रयत्नशील असतो, बरेचसे बिल्डर अशी घरे उपलब्ध करून देत असतात. पुण्यात ह्या प्रदर्शनाला प्रतिसाद तरी भरघोस मिळाला पण एखाद्या बिल्डर ने जरी अशी संकल्पना प्रत्यक्षात आणली तर पर्यावरणाचा ह्रास कमी होईल असे स्वप्न बघायला हरकत नाही.

अशा घरांना वाळवी ते अन्य प्रकारच्या हानिकारक कीटकापासून सहज वाचवता येते. कौलारू छत पण देखभालीच्या प्रचंड काळजी ची काळजी न करता बसवता येते. टुमदार घर हे स्वप्न खूप कमी खर्चात आणि पिढ्यानपिढ्या जपून ठेवणे शक्य आहे हवाय फक्त असा बदल स्वीकारण्यासाठी मानसिकता आणि अशा घरांची सहज उपलब्धता. परिपूर्ण माहिती देणारी अशी उत्पादने आपला आणि धरतीचा ताण कमी करू शकतात.

मी जर कधी फार्म घेतले तर, सहज, सोपे, भक्कम, पूर्ण संरक्षित असेच पोर्टा केबिनचे टुमदार घर ठेवणार…. असा विचार करण्यासाठी अशा घराची हि छोटीशी पोस्ट