नाच रे मोरा……..मस्कत च्या पावसाळी वनात.

पावसाळी दिवस जवळ आले कि, आषाढी मेघ व मोरांचे नृत्य जसे ह्या गाण्यातून मनात रुंजी घालू लागते तसे मन हि मोररंगी होऊन प्रफुल्लीत होते. भारतात हे सहज शक्य आहे कारण पाऊस व भारतीय मनाचे दृढ असे नाते आहे. मस्कत मध्ये सुद्धा हा अनुभव घेता येतो. पाऊस नाही, वाळवंटी देश सर्वसाधारण तापमान हे ४५ ते ५५ पर्यंत असतेच मग हे कसे शक्य आहे? जिथे प्रतिकूल परिस्थिती असते तिथे मानवी श्रम, बुद्धी, आणि उपलब्ध पैसा असेल तर शक्य करता येते. पावसाळी वनाचे म्हणजे ज्याला रेन फोरेस्ट असे म्हंटले जाते ते वन इथे आहे.

आपण नेहमी हॉटेल मध्ये जातो एखादा धबधबा, बागेत फिरणारी बदके, छोट्याशा तळ्यात उमलेली कमळे हे सर्व साधारण रिसोर्ट चे रूप असते. जेवण्यास, गप्पा करण्यास निसर्गाच्या सानिध्यात असणे आता अप्रूप राहिले नाही. मस्कत मध्ये बरका म्हणून एक भाग आहे अत्यंत रुक्ष आहे असे म्हणणे आता योग्य होत नाही कारण इथे अल नाधा रिसोर्ट च्या मागे हे पावसाळी वन उभारलेले आहे हे वन आच्छादित आहे. इथले ‘श्री ददवाल’ आडनावाचे गृहस्थ हे भारतात्तून वीस वर्षापूर्वी सुगंधी वनस्पती संशोधनासाठी आले होते. त्यांची हुशारीव चिकाटी, संशोधन वृत्ती ह्यामुळे आज हे वन निर्माण झाले आहे. दोन ते चार व्यक्ती हाताशी घेऊन सुरवातीला काकडी, लिंबू, काही फळभाज्या असे उत्पादन केवळ छोट्याशा ग्रीन हाउस मध्ये घेतले.

अथक परिश्रम करून आज विस्तृत असे रेन फोरेस्ट झाले आहे. घनदाट जंगल, पावसाळी वातावरण, जंगलातून जाणाऱ्या छोट्या पायवाटा मध्ये मध्ये अंगावर उडणारे पावसाचे तुषार हे खरोखरी जंगलाचा आनंद मिळवून देतात. बाहेर तापमान ४५ असताना आत मध्ये जंगलात केवळ २५ डिग्री सेल्सिअस तापमान असते. संगणकावर एक रेन फोरेस्ट चा स्क्रीन आहे अगदी तसाच फील येतो.

पावसाचे तुषार व पावसाळी कुंद, थंड अशी वेगळीच हवा मनावरचे सगळे ताण चटकन नष्ट करते. नुसते जंगल नाही तर तुम्ही प्रवेश केल्यावर प्रथम एक नाद ऐकू येतो जंगलातील पक्षांचे किलबीलणे, हळूहळू येणारा असा ढगांचा आवाज व नंतर पानांवरून ओघळणारे व अंगावर उडणारे पावसाचे तुषार सर्व अकृत्रिम आहे ह्या वर विश्वास बसत नाही. खंडाळ्याच्या घाटाचा, केरळच्या जंगलाचा असा प्रत्येकाला जसा परिचित तसा भास नव्हे तर खरच अनुभव येतो.

आज दद्वालजीना रेनमॅन म्हणून ओळखले जाते. सदाहरित घनदाट जंगल तर आहेच पण इथे जगातल्या सर्व प्रकारच्या आंब्याची झाडे आहेत. काही जातींना वर्षभर आंबा मिळतो. २००० आंब्याची झाडे आहेत. एका जातीला दीड ते दोन किलोचा एकेक आंबा लागतो. ५०० ते १००० किलो आंबा दरोरोज इथल्या बाजारात विकण्यास पाठवतात. ७५ एकरवर लिंबू व सफरचंदाची झाडे आहेत. प्रत्येक फळझाड इथे विस्तृत प्रमाणात आहेत. श्री दद्वालजी व स्टीफन यांनी ग्रीन हाउस मध्ये विविध ओर्चीड पण यशस्वीरीत्या वाढवली आहेत त्यात कीटक खाणारे पिचर ओर्चीड पण आहे.

आंब्याच्या वनात नाचणारे सुमारे ६० मोर आहेत. विस्तृत असे तळे त्या मध्ये विहार करत असलेली बदके. असंख्य जातीचे पक्षी इथल्या पावसाळी वनात सुखाने मनसोक्त घरटी करून आहेत. केळ्याचे अफाट असे उत्पादन आहे. एव्हढेच काय पण द्राक्ष मळे, उसाची शेती पण इथे आहे. ३५० एकर जमिनीने त्यांना साथ दिली व भरघोस उत्पादन देऊ लागली. पावसाळी वन हे इनडोअर आहे पण बाकीची शेती हि केवळ मोकळ्या जमिनीवर हिरवे हिरवे गडद गालीच्या चे नेत्रसुख देऊन तप्त अशा ओमानी वातावरणात शांतता निश्चित देते.

अत्यंत आकर्षक अशी फुलझाडे, ग्रीन हाउस मध्ये फुलझाडांवर उडणारी फुलपाखरे, ससे, हरीण, कुत्रे, अनेक जातीचे पक्षी असा छान झु येथे आहे. अजूनही फक्त ३० टक्के काम झाले आहे ७० टक्के बाकी आहे अशी नम्र भावना श्री. दाद्वाल्जींची आहे. ह्या सर्वाचे श्रेय ते इथल्या निसर्गाला, परिश्रम करणाऱ्या फार मोठ्या अशा कर्मचारी वर्गाला देतात. पाण्याचे योग्य नियोजन, खताचे प्रमाण योग्य ठेवून नैसर्गिक खत ते वापरतात. त्याकरता जमिनीचा काही भाग खत निर्मितीसाठी ठेवला आहे. इथे पाऊस नसताना उस, कापूस, तांदूळ पासून ते ओर्चीड पर्यंत इथे निर्माण केले आहे. सतत प्रयोगशील वृत्ती व नम्र पणा इथे पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतो. आखाती देशाचे, युरोपिअन, ओमानी लोक पावसाळी वनात नेहमीच येतात.

असा हा रम्य पावसाळी वनाचा अनुभव, आंब्यांचे वन नृत्य करणारे मोर, अनेक पक्षी, विविध फळे, फुलझाडे यांनी आकर्षित केलेला परिसर, तेथील वास्तव्य संपूच नये असे वाटते. ह्या निसर्ग समवेत भारतीय लाझीझ अशा पदार्थापासून ते अनेक देशांचे पदार्थ आपली भूक व रसना तृप्त करतात. अर्थात मुख्य आकर्षण आहे ते इथले रेन फोरेस्ट म्हणजेच पावसाळी सदाहरित जंगल.

भारताची आठवण आली कि सरळ जावे ह्या वनात व मनाच्या मोराचा पिसारा अलगद फुलवून ताण विसरून ओमानी वनात रमावे . प्रसन्न करणारा एखादा दिवस पण सकारातमक ठरतो. वनाचा आनंद व त्यामागचे परिश्रम व हरित पृथ्वीचा दिलेला संदेश मला रिसोर्ट मध्ये भावला व तो आपल्यापर्यंत पोहचवला.

रिसोर्ट मध्ये असणारी ट्री हाउसेस, २१ मीटर लांबीचा सोना टनेल, जोजोबा गार्डन, स्पा, रोझ गार्डन, सोलर, शेती असा विस्तृत आवाका ह्या रिसोर्ट चा आहे. केवळ व्यवसाय म्हणून नव्हे तर प्रतिकूल परिस्थितीत पण निसर्ग निर्माण केला जाऊ शकतो. कल्पकता व हिरवाईची आवड हि मुख्य प्रेरणा आहे. ओमान मध्ये का शक्य नाही म्हणून घेतलेला ध्यास हा बुद्धीजीवी तर आहेच पण निसर्ग निर्माण करून गो ग्रीन करता केलेला यशस्वी असा प्रकल्प ठरतो.